अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर वडील सलीम खान यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'त्याने सांगितलं तेव्हा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:22 AM2023-12-27T10:22:13+5:302023-12-27T10:22:37+5:30
अरबाज खान वयाच्या 56 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला
सध्या बॉलिवूडमध्ये एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. ज्येष्ठ लेखक सलीम खान (Salim Khan) यांचा मुलगा अरबाज खान (Arbaaz Khan) याने नुकतंच दुसऱ्यांदा लग्न केलं. मलायका अरोरासोबत घटस्फोटानंतर अरबाजचं नाव जॉर्जियासोबत जोडलं गेलं. मात्र नंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि अचानक अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत निकाह केला. यामध्ये अरबाजसोबत भाई सलमान खानसह संपूर्ण कुटुंब सामील झालं होतं. नुकतंच अरबाजचे वडील सलीम खान यांनी लेकाच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, 'त्याने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामते तरी हा कोणता गुन्हा नाही. मी त्याच्यासाठी खूप खूश आहे आणि दोघांना माझा आशीर्वाद देतो. मला नाही वाटत यावर जास्त चर्चा होण्याची गरज आहे. दोघंही शिक्षित आहेत त्यांना समज आहे आणि ते त्यांचा निर्णय घेण्यास समर्थ आहेत.'
ते पुढे म्हणाले, 'अरबाजने जो निर्णय घेतला त्यात त्याला कोणाची परवानगी घेण्याची गरजच नाही. त्याने जेव्हा मला या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा मी लगेच हो म्हणलं. मला त्याचा आनंद जास्त महत्वाचा आहे. कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ न करणंच चांगलं नाहीतर अडचण होऊ शकते. '
अरबाज खान वयाच्या 56 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. 1998 मध्ये त्याने मलायका अरोरासह लग्नगाठ बांधली होती. त्यांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगाही आहे. तब्बल १९ वर्षानंतर अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला जो अगदी चर्चेचा विषय होता. घटस्फोटानंतर ६ वर्षांनी अरबाज खान पुन्हा लग्नबंधनात अडकला.