१६ वर्षांनी लहान शूराशी लग्न करण्याबाबत अरबाज स्पष्टच बोलला, म्हणाला, "वयात जास्त अंतर असणारी लग्नच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:45 AM2024-02-09T09:45:49+5:302024-02-09T09:46:33+5:30
वयाने लहान असलेल्या शूराबरोबर संसार थाटल्याने अरबाजला ट्रोलही केलं गेलं होतं. आता यावर अरबाजने मौन सोडत भाष्य केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने काही दिवसांपूर्वीच मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला. त्याच्या दुसऱ्या लग्नाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ५६व्या वर्षी अरबाजने पुन्हा निकाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. पण, वयाने लहान असलेल्या शूराबरोबर संसार थाटल्याने त्याला ट्रोलही केलं गेलं होतं. आता यावर अरबाजने मौन सोडत भाष्य केलं आहे.
अरबाज खानपेक्षा त्याची दुसरी पत्नी शूरा लहान आहे. त्या दोघांमध्ये जवळपास १५ वर्षांचं अंतर आहे. यावर अरबाजने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, "या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत असं नाही. किंवा आम्ही एकमेकांपासून हे लपवलेलं देखील नाही. एक मुलगी म्हणून तिला माहीत आहे की ती काय करत आहे. तर मलाही माहीत होतं की मी काय करतोय. एकाच वयोगटातील दोन व्यक्ती एकमेकांबरोबर असू शकतात आणि एकाच वर्षात विभक्तही होऊ शकतात. फक्त वय रिलेशनशिपला पुढे घेऊन जातं का? हे एकदा स्वत:ला विचारा. मला तर वाटतं की जास्त वयाचं अंतर असणारी लग्नच जास्त यशस्वी होतात."
"माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप लहान आहे. पण, ती १६ वर्षांची आहे असं नाही. त्यामुळे तिलाही माहीत आहे की तिला आयुष्यात काय हवं आहे. आम्ही एकमेकांसोबत खूप वेळ एकत्र घालवला आहे. असे निर्णय घाईघाईत घेतले जात नाहीत," असंही पुढे अरबाजने सांगितलं.
अरबाजने १९९८ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर जवळपास १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. मलायकापासून वेगळं झाल्यानंतर अरबाज जॉर्जिया अँड्रायानीला डेट करत होता. मात्र काही कारणांमुळे त्यांच्याच ब्रेकअप झालं.