अनुपम खेर आणि अर्चना पुरणसिंग यांच्यावर चित्रीत केला जाणार होता किसिंग सीन, अर्चनाची झाली होती अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:30 AM2019-06-14T06:30:00+5:302019-06-14T06:30:02+5:30
अनुपम आणि अर्चना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या कार्यक्रमात अर्चना पुरण सिंगने दीपक शिवदासानी दिग्दर्शित ‘लडाई’ चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. यंदाच्या आठवड्यात या कार्यक्रमात अनुपम खेर आणि ईशा गुप्ता त्यांच्या वन डे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहेत.
सारांश या आपल्या पाहिल्याच चित्रपटात केलेल्या 65 वर्षांच्या वृद्ध निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेपासून ते न्यू अॅमस्टरडॅम नामक आंतरराष्ट्रीय मालिकेत ‘डॉक्टर विजय कपूर’ पर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे आणि अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करणारे अभिनेते अनुपम खेर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोच्या या वीकएंडच्या भागात दिसणार आहेत. त्याच्या सोबत असेल देखणी अभिनेत्री ईशा गुप्ता. चित्रपट उद्योगाचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या अनुपम खेर यांच्यासोबत प्रेक्षक नक्कीच या कार्यक्रमात भूतकाळातील आठवणींत रमतील.
द कपिल शर्मा या कार्यक्रमात मिस्टर मल्होत्रा म्हणजेच अनुपम खेर आणि मिस ब्रिगॅंझा म्हणजेच अर्चना पुरण सिंग यांच्यासोबत ‘कुछ कुछ होता है’चे दिवस पुन्हा अनुभवायला मिळणार आहेत. अनुपम आणि अर्चना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या कार्यक्रमात अर्चना पुरण सिंगने दीपक शिवदासानी दिग्दर्शित ‘लडाई’ चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, रेखा, डिंपल कपाडिया, अनुपम खेर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील एका प्रसंगाविषयी अर्चना सांगतात, “आम्ही ‘लडाई’ चित्रपटासाठी शूटिंग करत होतो. या चित्रपटात माझे आणि अनुपमचे किसिंग दृश्य असावे असे दीपकचे म्हणणे होते. मला जेव्हा हे समजले तेव्हा मी घाबरले होते... कारण मी पडद्यावर यापूर्वी कधीच असे दृश्य दिले नव्हते. मी दीपकला फोन करून सांगितले की मी ते करू शकणार नाही. त्यामुळे ते दृश्य चित्रीत झालेच नाही.”
यावर अर्चनाने अनुपम खेर यांना विचारले की, त्यावेळी त्यांचे किरण खेर यांच्याशी लग्न झालेले असल्याने अर्चनाचे चुंबन घेण्याची त्यांना भीती वाटत होती का? त्यावर अनुपम म्हणाले, “नाही, मला किरणची भीती वाटत नव्हती. उलट, इतर अभिनेत्यांप्रमाणे मलाही किसिंग सीन करायला मिळणार म्हणून मी आनंदात होतो. पण तू तयार नसल्याचे कळल्यावर मी दीपकजींना ते दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याची विनंती केली.”