-अन् अर्जुन कपूरच्या हातून निसटला इतका मोठा चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 04:15 PM2018-10-14T16:15:07+5:302018-10-14T16:16:25+5:30
दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण...
भारतात क्रिकेट इतका दुसरा कुठलाच खेळ लोकप्रीय नाही. हेच कारण आहे की, क्रिकेटप्रेमी क्रिकेटपटूंची देवासारखी पूजा करतात. क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अनेकांना लोक आजही मानतात. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला; तो क्षण आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात जिवंत आहे. त्यामुळेच दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगकपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण फार कमी लोकांना ठाऊक आहे की, वर्ल्ड कपवर आधारित चित्रपट आधी अभिनेता अर्जुन कपूर करणार होता. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार,‘लाहौर’ दिग्दर्शित करणारे संजय पूरन सिंह चौहान १९८३ वर्ल्ड कपवर आधारित चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन फँटम फिल्म्सकडे गेले होते. कपिल देव यांचा बायोपिक म्हणून हा चित्रपट बनवला जाणार होता़ संजय पूरन सिंह यांनी फँटमसोबतच अर्जुन कपूरलाही या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली होती़ अर्जुन कपूरने चित्रपटाची स्टोरी ऐकताच चित्रपटाला होकार दिला होता. आता फक्त फँटमच्या होकाराची प्रतीक्षा होती. पण अचानक फँटमने अर्जुन कपूर आणि पूरन यांना नाही तर रणवीर सिंग आणि कबीर खान यांना घेऊन हा चित्रपट पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतला. फँटम असे काही करणार, याची अर्जुन व पूरन या दोघांनाही कल्पना नव्हती. रणवीर सिंग आणि कबीर खान १९८३ वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आणणार, हे दोघांसाठीही धक्कादायक होते. अर्जुन कपूर व रणवीर सिंग दोघेही चांगले मित्र आहेत, त्यामुळे यावर कुठलाही वाद झाला नाही. पण असे काय झाले की, फँटमने अचानक नव्या टीमसोबत हा चित्रपट पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतला, हे मात्र कळले नाही.