Arjun Kapoor: हे आता अति झालं, लोकांना...; ‘बायकॉट ट्रेंड’मुळे भडकला अर्जुन कपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 10:27 AM2022-08-17T10:27:37+5:302022-08-17T10:28:07+5:30
Arjun Kapoor on Bollywood Boycott Trend: बायकॉट ट्रेंडमुळे अर्जुन कपूर चांगलाच भडकला आहे. ‘आता अति झालंय... लोकांना धडा शिकवावा लागणारच,’ अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.
Arjun Kapoor on Bollywood Boycott Trend: बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक सिनेमे आपटत आहेत. एकीकडे सोशल मीडियावर ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंड चालवला जातोय, दुसरीकडे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरकेनासे झाले आहेत. आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’, अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या सिनेमांना सोशल मीडियावर विरोध झाला. आता #BoycottVikramVedha, #BoycottBrahmastra , #BoycottVikramPathan, #BoycottBollywood ट्रेंड होऊ लागलं आहे. या कॉन्ट्रोव्हर्सीवर आता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) प्रतिक्रिया दिली आहे. बायकॉट ट्रेंडमुळे अर्जुन कपूर चांगलाच भडकला आहे. ‘आता अति झालंय... लोकांना धडा शिकवावा लागणारच,’ अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.
आम्ही लोक शांत राहिलो...
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूर बायकॉट बॉलिवूड ट्रेंडवर बोलला. ‘आता संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला एकत्र येऊन याविरोधात लढा द्यावा लागणार. कारण हे दिवसागणिक वाढत चाललंय. आता ट्रोलर्सला उत्तर देण्याची वेळ आली आहे. इंडस्ट्रीतले आम्ही लोक शांत राहिलो, कदाचित इथेच आमचं चुकलं. आम्ही विनम्रता दाखवली आणि ट्रोलर्सने याचा फायदा घेतला. जे मनात येईल ते लोक बोलत आहेत. मला विचाराल तर आमचं काम बोलेल, आम्ही ट्रोलर्सच्या कमेंट्सवर रिअॅक्ट करून खालची पातळी का गाठायची, असं माझं मत होतं. पण आता अति झालं आहे. बॉलिवूडला बायकॉट करण्याचा ट्रेंड लोकांची सवय बनू लागली आहे. आम्हा सर्वांना एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. कारण लोक आमच्याबद्दल बोलत आहेत. हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. त्यांना रिअॅलिटीची काहीही देणंघेणं नाही. आम्ही एखादा सिनेमा करतो, तो बॉक्सआॅफिसवर चालला तर लोक आम्हाला डोक्यावर घेतात. पण ते आमच्या आडनावामुळे नाही तर आमच्या कामामुळे. पण आता लोक ज्या पद्धतीने वागत आहेत ते अजिबात खपवून घेण्यासारखं नाही,असं अर्जुन म्हणाला.
‘दर शुक्रवारी नव्या सिनेमाबद्दलची लोकांची उत्सुकता, त्यांचा क्रेझीनेस कमी होत आहे. तुम्ही सतत चिखल फेकाल तर नवीकोरी गाडीही आपली चमक गमावून बसेल. गेल्या काही वर्षांत आमच्यावर खूप चिखलफेक झाली. पण आम्ही शांत राहिलो. लोक चिखलफेक करत राहिले आणि आम्ही त्यावर काहीच रिअॅक्ट केलं नाही. पण आता हे थांबण्याची चिन्हं नाहीत,’अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
अर्जुन कपूरच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं तर द लेडी किलर आणि कुत्ते या सिनेमात तो दिसणार आहे.