'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूरने साकारलेल्या डेंजर लंकाला मिळतेय पसंती, अभिनेता म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:37 PM2024-11-06T17:37:28+5:302024-11-06T17:38:51+5:30
Arjun Kapoor Singham Again : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळत आहे.
रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again Movie) चित्रपट दिवाळीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान 'सिंघम अगेन'मधील डेंजर लंका या त्याच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे तो खूप खूश आहे. २०१२ मध्ये 'इशकजादे' करताना जसं वाटलं होतं तसंच 'सिंघम अगेन'च्या पात्राने त्याला त्याच्या मुळाशी जोडलं आहे, असं तो म्हणाला.
अर्जुन म्हणाला, "डेंजर लंका सारख्या पात्रासह पडद्यावर परत आल्यावर असे वाटते की, जिथून माझ्या करिअरची सुरुवात झाली, तिथून मी मूळांशी जोडलो आहे, कारण मी इशकजादेमध्येही गंभीर भूमिका केली होती." रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून अभिनेत्याला खूप आनंद झाला आहे.
डेंजर लंका चाहत्यांना भावला
अर्जुन कपूर पुढे म्हणाला की, "डेंजर लंकाला मिळालेला प्रतिसाद माझ्यासाठी खूप खास आहे. चाहत्यांना माझा हा अवतार खूप आवडला. प्रत्येक भूमिका तुम्हाला आकार देते, आणि या भूमिकेने मला त्या क्षणाची आठवण करून दिली आहे जिथे मी हा बदल स्वीकारला आणि मला या प्रवासात सामील केले." डेंजर लंकाच्या भूमिकेसाठी रोहित शेट्टीचे आभार व्यक्त करताना अर्जुन म्हणाला, "या भूमिकेसाठी रोहित सरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."
सिनेमाने केली इतकी कमाई
सिंघम अगेन सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अक्षय कुमार, रणवीर सिंह, टाइगर श्रॉफ, करीना कपूर खान, दीपिका पादुकोण आणि जैकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत आहे. ‘सिंघम अगेन’ने पहिल्या चार दिवसांत भारतात १३९.२५ कोटी रुपयांची कमाई केली. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने १४०.११ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.