'लंडन फाइल्स' वेबसीरिजमध्ये झळकणार अर्जुन रामपाल, दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 07:40 PM2022-04-16T19:40:38+5:302022-04-16T19:41:03+5:30
London Files: इंग्लंडमध्ये चित्रीकरण झालेली वेबसीरिज लंडन फाइल्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) 'लंडन फाइल्स' (London Files) या सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. अर्जुन रामपालसोबत अभिनेता पूरब कोहली मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सचिन पाठक यांचे दिग्दर्शन आणि जार पिक्चर्सची निर्मिती असलेली ही सहा एपिसोड्सची सीरिज २१ एप्रिलला वूट सिलेक्टवर रिलीज होणार आहे.
'लंडन फाइल्स' ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर मालिका आहे. डिटेक्टिव्ह ओम सिंगच्या भूमिकेत असलेल्या अर्जुन रामपालने लंडन शहरातील हरवलेल्या व्यक्तीची केस घेतल्यावर घडणाऱ्या घटना ही मालिका दाखवते. वैयक्तिक समस्यांचा सामना करत असलेल्या ओमला मीडियातील दिग्गज अमर रॉयच्या हरवलेल्या मुलीची केस घेणे भाग पडते. पूरब कोहलीने भूमिका केलेला अमर हा अत्यंत क्रूर अँटी इमिग्रेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. ओम प्रकरणाची चौकशी सुरू करतो तसे एक अधिक गडद रहस्य प्रकाशात येते. त्यातून गाडली गेलेली सत्ये आणि ओमचा दाबला गेलेला इतिहास प्रकाशात येण्याची भीती निर्माण होते. चित्तथरारक ड्रामा आणि सस्पेन्स यांनी सज्ज असलेल्या लंडन फाइल्समध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये गोपाल दत्त, सपना पब्बी, मेधा राणा, सागर आर्या आणि ईवा जेन विलिसही आहेत.
याबद्दल अभिनेता अर्जुन रामपाल म्हणाला, लंडन फाइल्स' ही मालिका मी यापूर्वी केलेल्या इतर प्रकल्पांपेक्षा वेगळी आहे. खरे सांगायचे तर भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर मी अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प मी पाहिलेला नाही असे मला वाटते. ओम (माझी व्यक्तिरेखा) एक हाय प्रोफाइल केसची चौकशी करतो त्या वेळी आज रोजच्या रोज दिसणाऱ्या अनेक समस्या त्यातून दिसतात. डिटेक्टिव्ह ओमची व्यक्तिरेखा अनपेक्षित, चुकांनी भरलेली आणि गुंतागुंतीची आहे आणि मी हे मान्य करेन की, या व्यक्तिरेखेला साकारताना माझ्यावरही त्याचा प्रभाव पडला.