मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये असलेल्या वयाच्या अंतराबाबत अर्जुनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 11:23 AM2019-06-08T11:23:18+5:302019-06-08T11:26:52+5:30
अर्जुन आणि मलायकामध्ये 12 वर्षांचे अंतर असून मलायका 45 वर्षांची तर अर्जुन 33 वर्षांचा आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना सध्या अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळतेय. अर्जुनच्या इंडियाज मोस्ट वाँटेड या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील मलायका आवर्जून उपस्थित राहिली होती. यावेळी पहिल्यांदाच दोघांनी मीडियासमोर एकत्र पोझ दिली आणि आता तर एका मुलाखतीच्या दरम्यान अर्जुनने मलायका आणि त्याच्या नात्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
अर्जुनने नुकत्याच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायका आणि त्याच्यात असलेल्या वयाच्या अंतराविषयी देखील मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. मलायकासोबत त्याचे एक खास नाते असून त्यांच्या दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतराचा त्यांच्या नात्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
मलायकाचे लग्न अभिनेता अरबाज खानसोबत झाले होते. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. बॉलिवूडमधील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जात असे. पण त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेतला आणि आता मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत नात्यात आहे. अर्जुन आणि मलायकामध्ये 12 वर्षांचे अंतर असून मलायका 45 वर्षांची तर अर्जुन 33 वर्षांचा आहे. या कारणामुळे त्या दोघांना अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. एवढेच नव्हे तर त्यांच्या नात्यावरून अनेकवेळा मीडियात देखील चर्चा ऐकायला मिळते. पण अर्जुन आणि मलायकामधील असलेल्या वयाच्या अंतरावरून चर्चा करणाऱ्यांना अर्जुनने सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने या मुलाखतीत म्हटले आहे की, अशाप्रकारची चर्चा करणाऱ्या लोकांचे माझ्या आयुष्यात काहीही महत्त्व नाहीये आणि त्यामुळेच त्यांच्या चर्चांना मी कधीच महत्त्व देणार नाही.
अर्जुन आणि मलायकाने त्यांचे नाते मीडियापासून का लपवले नाही याविषयी देखील अर्जुनने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, आम्ही मीडियासमोर येण्याचा विचार केला कारण आम्हाला वाटलं, मीडिया आमच्या नात्याचा आदर करत आहे. ते आमच्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारे वागत असल्यानेच आम्ही मीडियासमोर एकत्र येण्याचे ठरवले. काही वेळा उगाचच कोणत्याही गोष्टीबद्दल विचारले जाते अथवा त्याबद्दल लिहिले जाते. पण आमच्याबाबतीत तसे कधीही घडले नाही आणि त्याचमुळे आम्ही स्वतःहून त्यांना फोटो काढायला देतो... त्यांच्याशी गप्पा मारतो. मी केवळ त्यांना इतकेच सांगितले आहे की, आमच्या घराच्या खाली ठाण मांडून बसू नका. कारण असे केले तर आम्ही घरात लपून बसलेलो आहोत असे सगळ्यांना वाटेल. पण आम्ही कोणापासून काहीही लपवत नाही आहोत. केवळ माझ्या किंवा तिच्या शेजाऱ्यांना मीडियाचा त्रास होऊ नये असे मला वाटते. आम्ही काहीही चुकीचे करत नाहीये आहे असे माझे ठाम मत आहे. त्यामुळेच आम्ही मीडियापासून लपत आहोत असा संदेश लोकांपर्यंत पोहोचू नये असे मला वाटते.