एकेकाळी दारोदारी जाऊन सौंदर्य प्रसाधने विकायचा 'हा' अभिनेता; आज करतोय बॉलिवूडवर राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 05:52 PM2022-04-22T17:52:22+5:302022-04-22T17:53:23+5:30
Arshad warsi: वयाच्या १४ वर्षी त्याच्या वडिलांचं कर्करोगाने निधन झालं. वडिलांपाठोपाठ त्याच्या आईचंही दोन वर्षात निधन झालं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली.
कोणत्याही क्षेत्रात यश, नाव, प्रसिद्धी कमवायची असेल तर त्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. कोणतंही यश सहजासहजी मिळत नाही. त्यामुळेच आज कलाविश्वात दिसणारे अनेक सेलिब्रिटी संघर्ष करुन या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे अर्शद वारसी (arshad warsi). उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अर्शदने जीवनात बऱ्याच संघर्षमय परिस्थितीचा सामना केला आहे.
'सर्किट', 'जॉली' अशा असंख्य भूमिका साकारुन अर्शद वारसीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे. अर्शद १४ वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं कर्करोगाने निधन झालं. वडिलांपाठोपाठ त्याच्या आईचंही दोन वर्षात निधन झालं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली.
वयाच्या १८ व्या वर्षीच अर्शदने काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्याने एका सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांने लोकांच्या घरोघरी जाऊन सौंदर्यप्रसाधने विकली. त्यानंतर एका फोटो लॅबमध्ये काम केले. हे काम करत असतानाच त्याने त्याची नृत्याची आवडही जोपासली. अर्शदने मुंबईतील अकबर सामी यांचा डान्स ग्रुप जॉइन केला. त्यानंतर 1987 साली ‘ठिकाणा’ आणि ‘काश’ चित्रपटात त्याने बँकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं.
दरम्यान, डान्सर म्हणून काम करत असताना अर्शद वारसीला अमिताभ बच्चन यांची प्रोडक्शन कंपनी ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन’च्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याला खरी ओळख संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटात त्याने ‘सर्किट’ची भूमिका केली होती. त्यानंतर तो ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’, ‘ऐंथनी कोण है’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल 3’, ‘डबल धमाल’ या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला.