मुन्नाभाई ३ चित्रपटावरुन अर्शद वारसीचं निराशाजनक विधान, सर्कीट म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:42 PM2023-06-24T20:42:53+5:302023-06-24T20:56:09+5:30
मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
मुन्नाभाई फेम सरकिट म्हणजे अर्शद वारसी सध्या वेब सिरीजमध्ये व्यस्त आहे. असुर २ या त्याच्या वेब सिरीजच्या यशाचं तो सेलिब्रेशन करत आहे. अर्शदने नेहमीच विविध भूमिकांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून स्वत:च्या अभिनयाची छापही सोडली आहे. जॉली एलएलबी असेल किंवा मुन्नाभाई, लगे रहो मुन्नाभाई असेल अर्शदच्या अभिनयाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. त्यामुळे, चाहत्यांनी उत्सुकता आहे ती, मुन्नाभाई चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची. मात्र, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अर्शदने मुन्नाभाई ३ बद्दल निराशाजनक विधान केलं आहे.
मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमांनी सुपरहीट कमाई केली. त्यामुळे, साहजिकच चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना अपेक्षा लागून राहिली आहे. या चित्रपटाची चर्चाही माध्यमांत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत होत असते. मात्र, अर्शद वारसीने केलेल्या विधानामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. अर्शदने इंडिया टुडे डॉट. कॉमला दिलेल्या मुलाखतीत मुन्नाभाई ३ चित्रपटाबद्दल विधान केलं आहे.
मुन्नाभाई ३ कदाचित होणार नाही, असे अर्शदने म्हटले, त्यामुळे चाहत्यांची निराशा होणार आहे. अर्शदने पुढे बोलताना म्हटले की, आमच्याकडे दिग्दर्शक आहे, जे हा चित्रपट बनवू इच्छितात. प्रोड्युसरही आहे जे या चित्रपटाचे निर्माता आहेत. प्रेक्षकही आहेत, जे हा चित्रपट पाहू इच्छितात. अभिनेते आहेत, जे यात अभिनय करू इच्छितात. पण, तरीही चित्रपटाचं काम होत नाही.
राजू हिराणी हे परफेक्शनिस्ट आहेत. त्यांच्याकडे तीन स्क्रीप्ट आहेत, ज्या शानदार आहेत. पण, काहीतरी गडबड आहे. म्हणूनच, जोपर्यंत १०० ते २०० टक्के खात्री वाटणार नाही, तोपर्यंत राजू हिराणी तो चित्रपट सुरु करणार नाही, असे अर्शदने म्हटले आहे. दरम्यान, मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट २००३ साली सर्वप्रथम रिलीज झाला होता. त्यानंतर, २००६ मध्ये लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.