नितीन देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच पहिल्या चित्रपटासाठी केलेली भावूक पोस्ट ठरली शेवटची, म्हणालेले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:51 AM2023-08-02T10:51:55+5:302023-08-02T10:53:05+5:30
Nitin Desai Suicide : नितीन देसाईंची आत्महत्या, काही दिवसांपूर्वीच पहिल्या चित्रपटासाठी केलेली भावूक पोस्ट
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
८०च्या दशकापासून नितीन देसाई यांनी त्यांच्या कलाविश्वातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी दूरदर्शनवरील एका मालिकेसाठी काम केलं होतं. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या '१९४२ : अ लव्ह स्टोरी' या विनोद चोप्रांच्या चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला होता. या चित्रपटात अनिल कपूर, मोनिषा कोईराला, जॉकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. नितीन देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटासंबंधात पोस्ट केली होती. १५ जुलै १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला २९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ही पोस्ट केली होती.
नितीन देसाई यांनी '१९४२ : अ लव्ह स्टोरी' या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. "तुमच्या फेव्हरेट लव्ह स्टोरीला २९ वर्ष पूर्ण झाली," असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. पहिल्या चित्रपटाबाबत केलेली ही पोस्ट त्यांची शेवटची पोस्ट ठरली. या चित्रपटानंतर त्यांनी देवदास, हम दिल दे चुके सनम, रंगीला, दौड अशा सुपरहिट चित्रपटांसाठी काम केलं होतं. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठीही काम केलं होतं.