अरुण गोविल यांनी सांगितला 'रामायण'च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा, म्हणाले - 'त्या महिलेनं...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:36 PM2023-06-23T17:36:32+5:302023-06-23T17:37:03+5:30
रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचे रामायण लोकांना कसे प्रभावित करायचे, याचे एक उदाहरण नुकतेच अरुण गोविल (Arun Govil) यांनी दिले आहे.
प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) १६ जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटातील संवाद आणि पात्रांवर काहींनी आक्षेप घेतला. या चित्रपटावर बऱ्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिली. या चित्रपटावर रामायण (Ramayana) मालिकेसह महाभारत मालिकेतील कलाकारांनीदेखील टीका केली. दरम्यान आता रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचे रामायण लोकांना कसे प्रभावित करायचे, याचे एक उदाहरण नुकतेच अरुण गोविल (Arun Govil) यांनी दिले आहे.
एक प्रसंग सांगताना अरुण गोविल म्हणाले की, ते सेटवर रामच्या गेटअपमध्ये बसले होते, तेव्हा एक महिला आपल्या आजारी मुलाला घेऊन रडत आली आणि त्याला वाचवण्याची विनवण्या करू लागली. महिलेने अरुण यांना आजारी मुलाच्या डोक्यावर हात ठेवण्यास सांगितले जेणेकरून तो बरा होईल. हा सर्व प्रकार पाहून अरुण गोविल घाबरले आणि त्यांनी त्या महिलेला रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
महिलेनं तिचं बाळ माझ्या पायावर ठेवले
अरुण गोविल झी न्यूजशी बोलताना म्हणाले की, महिलेच्या हातात एक लहान मूल होते. तो खूप आजारी होता. ती सेटवर आली आणि प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी लोकांशी बोलू लागली. तिथे उपस्थित लोकांनी त्या महिलेला माझ्याकडे पाठवले. जवळ येताच तिने तिचे बाळ माझ्या पायावर ठेवले. ती ओरडू लागली आणि म्हणाली की तिचे मूल मरणार आहे, कृपया त्याला वाचवा. तिने माझा हात घेऊन मुलाच्या डोक्यावर ठेवला. मी त्या महिलेला ताबडतोब दवाखान्यात नेण्यास सांगितले. मात्र, त्या मुलाच्या आरोग्यासाठी मी मनापासून प्रार्थना केली.
तीन दिवसात मूल स्वतःच्या पायावर चालू लागले
अरुण यांनी सांगितले की, तीन दिवसांनी तिच महिला पुन्हा आली. यावेळी तिचे बाळ ठीक दिसत होते. तीन दिवसांपूर्वी जीवन-मृत्यूच्या कचाट्यात अडकलेला मुलगा आईचा हात धरून त्याच्या शेजारी चालला होता. अरुण म्हणाले की, मला याच्याशी काही देणंघेणं नव्हतं, पण हे सगळं शक्य झालं ते त्या स्त्रीमुळे आणि माझ्या रामावरच्या विश्वासामुळे.
रामायण किंवा त्यातील पात्रे कधीही विनोदाचा विषय होऊ शकत नाहीत
अरुण गोविल यांनी सांगितले की, रामायण किंवा त्याच्याशी संबंधित पात्रे कधीच विनोदाचा विषय होऊ शकत नाहीत. लोकांच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. चित्रपट निर्माते सामान्य चित्रपटाप्रमाणे रामायण बनवू शकत नाहीत. कदाचित याच कारणामुळे आदिपुरुषाच्या रिलीजनंतर रामानंद सागर यांच्या रामायणाची आणि त्यातील कलाकारांची सर्वाधिक चर्चा होत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या सर्व कलाकारांनी आपली व्यक्तिरेखा केवळ साकारली नाही तर ती जगली आहे.