Aryan Khan Arrest Updates: तुला गरजंय असं नाही, तरीही मी तुझ्यासोबत, शाहरुखची जुनी अभिनेत्री वेळेला धावली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 02:04 PM2021-10-04T14:04:40+5:302021-10-04T14:05:31+5:30
एनसीबीने आर्यनसह 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. शाहरूखसारख्या बड्या स्टार्सचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकलेला पाहून याचे पडसाद उमटणे साहजिक होते.
मुंबई - बॉलिवूडचा बादशहा ‘किंगखान’ शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची कालची रात्र कोठडीत गेली. काल दुपारी आर्यनला ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक झाली. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अलिशान क्रूजवर रंगलेल्या पार्टीत आर्यन खान हजर होता. एनसीबीने या क्रूझवर छापा टाकत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. यादरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी बॉलिवूडमधील कलाकार शाहरुखच्या पाठिशी असल्याचं सांगत त्यास धीर देत आहेत.
एनसीबीने आर्यनसह 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. शाहरूखसारख्या बड्या स्टार्सचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकलेला पाहून याचे पडसाद उमटणे साहजिक होते. सोशल मीडियावर या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकरणावर परखड प्रतिक्रिया नोंदवली. तर, अभिनेता सुनील शेट्टीने आर्यनला श्वास तरी घेऊ द्या, असे म्हणत शाहरुखला पाठिंबा दर्शवल्याचे दिसून येते. तसेच, अभिनेत्री पुजा भट्ट हिनेही शाहरुखच्यासोबत असल्याचे सांगत ही वेळ निघून जाईन, असे ट्विट केले आहे.
I stand in solidarity with you @iamsrk Not that you need it. But I do. This too, shall pass. 🙏
— Pooja Bhatt (@PoojaB1972) October 3, 2021
एनसीबीच्या कारवाईनंतर अभिनेत्री पूजा भट्ट आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी शाहरुखला पाठिंबा दर्शविला आहे. पूजाने 'चाहत' तर सुचित्राने 'कभी हा कभी ना' या चित्रपटात शाहरुखसोबत काम केलं होतं. पूजाने ट्विट करत लिहिलं, 'मी तुझ्यासोबत आहे. तुला आमची गरज आहे अशातला भाग नाही. पण तरी माझा पाठिंबा आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल.', असे ट्विट पूजाने केले आहे.
आर्यनला श्वास तरी घेऊ द्या
शाहरूखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतल्याप्रकरणी सुनील शेट्टीला प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर सुनील शेट्टी म्हणाला, ‘जेव्हा केव्हा रेड पडते तेव्हा अनेक लोकांना ताब्यात घेतलं जातं. अशात त्या मुलानेही ड्रग्जचे सेवन केलं असावं, असं आपण मानून चालतो. त्या मुलाला (आर्यन खान) थोडा श्वास तर घेऊ द्या. खरं काय ते समोर येऊ द्या. बॉलिवूडमध्ये एखादी घटना घडली की, मीडिया तुटून पडतो. सरळ सरळ निष्कर्ष काढून मोकळा होतो. त्या मुलाला संधी द्या. त्या मुलाची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे.’
काय म्हणाले विजय पाटकर?
एका सुपरस्टारच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक होणं फारच दुर्दैवी आहे. खरं तर नाट्यगृहं सुरू होणार म्हणून आम्ही आनंदात होता. पण अचानक समोर आलेलं हे प्रकरण दुर्दैवी आहे. माझ्यामते, हे जे काही घडलंय, तो फक्त आणि फक्त पैशाचा माज आहे. आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही वाट्टेल ते करू शकतो, राजकीय पातळीवरही सगळं हॅण्डल करू शकतो, हा निव्वळ माज आहे, असं विजय पाटकर म्हणाले.