आर्यन व त्याच्या कुटुंबानं जे भोगलं त्याची भरपाई कोण करणार? बॉलिवूड सेलिब्रिटींचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 01:57 PM2021-11-22T13:57:45+5:302021-11-22T13:58:28+5:30
Aryan Khan Case: दिग्दर्शक संजय गुप्ता, रामगोपाल वर्मा यांनी केला सवाल
क्रूझ ड्रग्जप्रकरणात शाहरूख खानचा ( Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryan Khan) जामीनावर सुटला. 28 ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर झाला. पण त्यासंबंधीच्या आदेशाची प्रत गेल्या शनिवारी उपलब्ध झाली आणि या आदेशात हायकोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण पाहून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी खवळले.
आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमून धमेचा हे केवळ क्रूझवर गेले म्हणून त्यांच्यावर कट रचल्याचा गुन्हा नोंदविण्यासाठी हे समाधानकारक कारण नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने या आदेशात नोंदवले आहे. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काहीच आक्षेपार्ह नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं. यावर आता काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संजय गुप्ता संतापले...
So Aryan Khan is and was innocent says Bombay High Court.
— Sanjay Gupta (@_SanjayGupta) November 20, 2021
Who compensates for what he went through, his family went through. https://t.co/LWNzbR7riB
दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर एनसीबीवर संताप व्यक्त केला.
‘तर आर्यन खान हा निर्दोष आहे आणि होता असं मुंबई उच्च न्यायालय म्हणतेय. मग त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी जे काही भोगलं त्याची भरपाई कोण करणार’, असं ट्विट संजय गुप्ता यांनी केलं.
लोकशाहीची थट्टा- रामगोपाल वर्मा
In the aftermath of Aryan Khan’s innocence , it will be a joke on democracy if investigative agencies are not made accountable for misusing their powers ..If this can happen to @iamsrk ‘s son God knows what’s happening to lesser people ?
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 21, 2021
एनसीबीवर संताप व्यक्त करत दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनीही एक ट्विट केलं. त्यांनी लिहिलं, ‘ आर्यन खानचं निर्दोषत्व समोर आल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे, तपास संस्था आपल्या शक्तींचा चुकीचा वापर करत आहेत. ही लोकशाहीचीच थट्टा आहे. शाहरूख खानच्या मुलासोबत हे घडलं असेल तर सामान्य लोकांचं काय होणार, हे देवचं जाणो. आर्यन खान प्रकरणात 2 वेगवेगळ्या कोर्टाने दिलेल्या निकालाची तुलना करणं भयावह आहे. असं असेल तर अखेर न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणार कोण?’
त्याला जबाबादार कोण?
कमाल राशीद खान अर्थात केकेआर यानेही ट्विट केलं. ‘मुंबई उच्चन्यायालयाने आर्यनला निर्दोष ठरवलं. पण तो 26 दिवस तुरुंगात राहिला, त्याला जबाबदार कोण?’
आर्यन आणि अन्य दोघांना न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी 29 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. आर्यन आणि अन्य दोन आरोपींना जामीन मंजूर करण्याच्या न्यायमूर्ती सांब्रे यांच्या तपशीलवार आदेशाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. आर्यनच्या फोनमधून मिळविलेले चॅट पाहिले असता त्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. आर्यनच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले नाहीत. तसेच अरबाझ व मुनमून यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण स्वतंत्रपणे विचारात घेतले तर ते अल्प असल्याचं न्यायमूर्ती सांब्रे यांनी आपल्या आदेशान म्हटलं आहे. त्याचप्रमाणे या आरोपींनी षड्यंत्राचा भाग म्हणून व्यावसायिक प्रमाणात ड्रग्ज बाळगून अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हेतुत: गुन्हा केल्याचं मानलं जावं, हे एनसीबीचं म्हणणं मान्य करण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.