ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 05:18 PM2023-03-23T17:18:24+5:302023-03-23T17:22:03+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'गेटवे ऑफ इंडिया'वरील भव्य सोहळ्यात होणार सन्मान

Asha Bhosle to be felicitated by 'Maharashtra Bhushan Award' this friday | ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार'

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार'

googlenewsNext

आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात 'चतुरस्र' हा शब्दही थीटा पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण श्रीमती आशाताई भोसले यांना शुक्रवारी २४ मार्च 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता  भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  

कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. सन 2021 या वर्षीच्या पुरस्कार श्रीमती आशा भोसले यांना जाहीर झाला. तो पुरस्कार  राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या  शुभहस्ते प्रदान केला जाईल. यावेळी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, विधान सभा अध्यक्ष अँड.श्री राहूल नार्वेकर,  सांस्कृतिक कार्य मंत्री, श्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी "आवाज चांदण्याचे" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार असून सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषीकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार हे कलाकार आशा भासले यांच्या सदाबहार गीतांचा  समुमधुर कार्यक्रम सादर करणार आहेत.  अभिनेते  सुमित राघवन हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य  असून  शिवाजी नाटयमंदिर,दादर, दामोदर हॉल,परळ, प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह,बोरीवली, दिनानाथ नाटयगृह,विलेपार्ले, काशिनाथ घाणेकर नाटयगृह,ठाणे, वासुदेव बळवंत फडके  नाटयगृह,पनवेल, आचार्य अत्रे नाटयगृह, कल्याण, गडकरी रंगायतन,ठाणे, विष्णूदास भावे नाटयगृह,वाशी या  नाटयगृहावर कार्यक्रमाचा सन्मानिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर उपलब्ध होतील.  या पुरस्कार समारंभास तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्वांना सस्नेह उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या श्रीमती आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला.
संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी  बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलंय. बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना 'मेलडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं.आशा ताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आशा भोसले, 1943 पासून या क्षेत्रात आहेत. ज्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.

विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत. भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं. आशाताईंच्या या सोनेरी कारकीर्दीचा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार थाटात संपन्न होणार आहे. 

Web Title: Asha Bhosle to be felicitated by 'Maharashtra Bhushan Award' this friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.