प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? ‘ते’ फोटो लीक झाल्याने आशा पारेख संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:34 AM2021-05-27T10:34:15+5:302021-05-27T10:35:29+5:30
कुणाचेही फोटो क्लिक करण्यासाठी लोकांना आता परवानगीची गरज वाटत नाही. हे फोटो लीक झालेले पाहून आम्हालाधक्का बसला होता, असे आशा म्हणाल्या.
आशा पारेख (Asha Parekh), वहीदा रहमान (Waheeda Rehman) आणि हेलेन (Helen )या तिघी बॉलिवूडच्या घट्ट मैत्रिणी. काही महिन्यांपूर्वी या तिघी मैत्रिणी हॉलिडेसाठी अंदमानला गेल्या होत्या. यानंतर काहीच दिवसांत त्यांच्या या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. चाहते हे फोटो पाहून एक्साइटेड झाले होते. पण आशा, वहिदा व हेलन मात्र हे फोटो लीक झाल्याने संतापल्या आहेत. वहिदा व हेलन अद्याप यावर बोललेल्या नाहीत. पण आशा यांनी मात्र ही नाराजी बोलून दाखवली आहे. प्रायव्हसी नावाची काही गोष्ट आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. (Asha Parekh, Waheeda Rehman and Helen PHOTOS from Andaman trip go viral)
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत आशा यावर बोलल्या.
त्या म्हणाल्या, ‘लॉकडाऊनआधी मार्च महिन्यांत वहिदा, हेलन व मी आम्ही अंदमानला गेलो होतो. ही एक अतिशय खासगी ट्रिप होती. किमान आम्हाला तसे वाटले होते. कारण या व्हॅकेशनचे फोटो लीक झाल्यावर ही ट्रीप खासगी राहिली नाही. हे फोटो कसे लीक झालेत, आमचे फोटो कुणी घेतले, आम्हाला माहित नाही. कदाचित तिथे आलेल्या टुरिस्टपैकी कुणाचे तरी हे काम असावे. कुणाचेही फोटो क्लिक करण्यासाठी लोकांना आता परवानगीची गरज वाटत नाही, हेच या फोटोंवरून दिसते. व्हॅकेशनवरून परतल्यावर हे फोटो लीक झालेले पाहून आम्ही तिघींनाही धक्का बसला होता. माझ्यापेक्षा वहिदा व हेलन दोघीही नाराज झाल्या होत्या. कारण त्या माझ्यापेक्षाही प्रायव्हेट पर्सन आहेत.
लोक आम्ही तिघीचे फोटो बेडर होऊन सोशल मीडियावर शेअर करत होते. आम्ही तिघींनी ‘दिल चाहता है’च्या सीक्वलमध्ये अभिनय करावा, अशा काय काय कमेंट्स देत होते. पण ‘दिल चाहता है’ का? कारण आमची ट्रिप ‘जिंदगी ना मिलेगी दोबरा’सारखी अधिक होती, असेही आशा म्हणाल्या.
सोशल मीडियावर काढला राग
सोशल मीडियाने पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तिंचा खासगीपणा हिरावून घेतला आहे. कुणीही तुमच्यासोबत सेल्फी घेऊ शकतो. आधी लोक ऑटोग्राफसाठी मागे येत. आता थेट सेल्फीसाठी विचारतात. कुठलीही सेलिब्रिटी आपल्या मित्रासोबत वा कुटुंबासोबत असातात लोकांचे असे वागणे घुसखोरीसारखे वाटू लागते, असेही त्या म्हणाल्या.