"सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी", भाजपा नेत्याचा अभिनेत्याला सल्ला; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:51 PM2024-10-14T12:51:59+5:302024-10-14T12:59:10+5:30
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची काल(12 ऑक्टोबर 2024) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Salman Khan : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची काल(12 ऑक्टोबर 2024) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने मुंबईत खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा मुंबई पोलीस चहुबाजूंनी तपास करत आहेत. हत्येची जबाबदारी स्वीकारणारी बिश्नोई गँगची एक फेसबुक पोस्टही समोर आली आहे . बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूड सेलिब्रिटींशी जवळचे संबंध होते. वांद्रे परिसरात त्यांचं कामकाज असल्याने आणि याच भागात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहत असल्याने त्यांचं बॉलिवूड कनेक्शन पाहायला मिळायचं. बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत(Salman Khan) खूप जवळचे संबंध होते. या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. दरम्यान, आता अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. अशातच भाजपचे माजी खासदार हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.
प्रिय @BeingSalmanKhan (सलमान खान )
— हरनाथ सिंह यादव (@harnathsinghmp) October 13, 2024
काला हिरण जिसे बिश्नोई समाज देवता मानता है उसकी पूजा करता है, उसका आपने शिकार किया और उसे पका कर खा लिया।
जिसके कारण बिश्नोई समाज की भावनाएं आहत हुई और आपके प्रति बिश्नोई समाज में लंबे समय से आक्रोश है।
व्यक्ति से गलती हो जाती है। आप बड़े… pic.twitter.com/1ywkry99Rq
भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हरनाथ सिंह यादव यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहलंय, "प्रिय सलमान खान..., बिश्नोई समाज ज्याला देव मानतो, ज्याची पूजा करतो त्या काळवीटाची तुम्ही शिकार केली आणि तुम्ही ते शिजवून खाल्लंत. या घडल्या प्रकारामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून तुमच्याबद्दल बिष्णोई समाजाच्या मनात तीव्र नाराजी आहे. माणसाकडून चुका होतात, तुम्ही मोठे अभिनेते आहात, देशात मोठ्या संख्येने लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुम्ही बिष्णोई समाजाच्या भावनांचा आदर करून तुमच्याकडून झालेल्या मोठ्या चुकीबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे". अशी सूचक पोस्ट करत हरनाथ सिंह यादव यांनी सलमानला सल्ला दिला आहे.
काय आहे काळवीट प्रकरण ?
१९९८ मध्ये जोधपूर येथे 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान त्याच्या सहकलाकारांसोबत शिकार करण्यासाठी गेला होता. साधारण २७ ते २८ सप्टेंबरच्या वेळेस त्याने तेथील घोडा फार्म हाउस येथे काळवीटाची शिकार केली होती. या संदर्भात अभिनेत्याविरोधात खटला दाखल करण्यात आला.
या काळवीट प्रकरणात बाबा सिद्दीकींनी सलमान खानला मदत केल्याचेही समोर आले होते. सलमानला २०१८ मध्ये काळवीट शिकार प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.