बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला मेकअप करून पोहोचली उर्वशी रौतेला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "एवढा अभिनय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 11:46 AM2024-10-14T11:46:53+5:302024-10-14T11:48:33+5:30
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील बाबा सिद्दिकींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेचा उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळी झाडून हत्या करण्यात आली. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दिकी यांच्यावर झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राजकीय आणि बॉलिवूड वर्तुळात धक्का बसला होता. रविवारी(१३ ऑक्टोबर) बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाब सिद्दिकी यांचे बॉलिवूड सेलिब्रिटींशी जवळते संबंध होते. बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाल्याचं कळताच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रुग्णालयात धाव घेतली होती. तर त्यांच्या अंत्यसंस्कारालाही सेलिब्रिटी उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील बाबा सिद्दिकींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेचा उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे.
इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन उर्वशीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत उर्वशीने पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्याचं दिसत आहे. पण, उर्वशीचा मेकअप पाहून नेटकरी अभिनेत्रीवर भडकले आहेत. "अंत्यदर्शनाला एवढा मेकअप करून येतात का?", "कोणी गेल्यावर पण हे लोक मेकअप करून येतात का", "एवढा चांगला अभिनय सिनेमात केला असता तर आज स्टार असतीस", "एवढा मेकअप करून कोण जातं", अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सहा आरोपींची ओळख पटवली असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जण अद्याप फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. याच दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट पटियाला जेलमध्ये रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली आहे.