‘अब तक छप्पन’मध्ये एकदम जबरदस्त भूमिकेत दिसला होता बाबासाहेब पुरंदरेंचा मुलगा... तुम्हाला माहित्येय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 08:00 AM2021-11-19T08:00:00+5:302021-11-19T08:00:02+5:30
Ab Tak Chhappan या चित्रपटातील साधू आगाशेच्या भूमिकेला तोड नाही. पण त्याच्या तोडीस तोड या चित्रपटातील आणखी एक चेहरा डोळ्यांत भरतो. तो म्हणजे, डॉन जमीरचा.
अब तक छप्पन!! ( Ab Tak Chhappan ) या सिनेमाचं नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो एकच चेहरा, तो म्हणजे नानाचा. होय, मुंबईच्या अंडरवर्ल्डवरवरचा राम गोपाल वर्माच्या या सिनेमात नाना पाटेकर ( Nana Patekar) यांनी साकारलेली एनकाऊंटर स्पेशालिस्ट साधू आगाशेची भूमिका म्हणजे निव्वळ अफलातून. साधू आगाशेच्या भूमिकेला तोड नाही. पण त्याच्या तोडीस तोड या चित्रपटातील आणखी एक चेहरा डोळ्यांत भरतो. तो म्हणजे, डॉन जमीरचा. होय, थंड डोक्याचा, अतिशय चलाख जमीर चित्रपटात जे काही करतो ते पाहून धडकी भरते ती आजही.
पण हा डॉन जमीर कोणी रंगवलायं, माहित्येय? तर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare ) यांचे धाकटे चिरंजीव प्रसाद पुरंदरे (Prasad Purandare) यांनी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला. याच शिवकथाकाराच्या लेकाने ‘अब तक छप्पन’मधील डॉन जमीरची भूमिका साकारली होती.
प्रसाद पुरंदरे यांनी लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पडघम, घाशीराम कोतवाल, महानिर्वाण अशा गाजलेल्या नाटकांत त्यांनी भूमिका साकारल्या. एकदिवस राम गोपाल वर्मा यांची त्यांच्यावर नजर गेली आणि ‘अब तक छप्पन’साठी त्यांना ‘डॉन जमीर’ सापडला. प्रसाद यांनी या भूमिकेत अगदी जीव ओतला. किंबहुना नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याच्या यांच्या तोडीस तोड अभिनय केला. सर्वांनीच त्यांच्या या भूमिकेचं मनापासून कौतुक केलं.
यादरम्यानच्या काळात प्रसाद यांनी नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी साहसी खेळांचे प्रशिक्षण सुरू केले.
बाबासाहेब पुरंदरे यांच्यामागे अमृत, प्रसाद व माधुरी अशी तीन अपत्ये आहेत. त्यांच्या कन्या ज्येष्ठ बालसाहित्यिेक व गायिका म्हणून ओळखल्या जातात. ज्येष्ठ चिरंजीव अमृत हे पुरंदरे प्रकाशनाची जबाबदारी सांभाळतात. तर प्रसाद हे नाट्य व साहसी क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत.