मला ऑफिसला बोलावलं आणि....! अभिनेत्रीने दिग्दर्शकावर केला गैरवर्तनाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 02:24 PM2020-01-13T14:24:36+5:302020-01-13T14:26:21+5:30
ते आपल्या जागेवरून उठले आणि माझ्या बाजूला येऊन बसले...
मीटू मोहिमेमुळे बॉलिवूड इंडस्ट्री ढवळून निघाले. आता हे वादळ बंगाली सिनेइंडस्ट्रीतपर्यंत पोहोचले आहे. होय, बंगाली सिनेमातील आघाडीची अभिनेत्री रूपंजना मित्रा हिने मीटू मोहिमेंअंतर्गत एक धक्कादायक खुलासा केला आहे. बंगाली सिनेमा दिग्दर्शक अरिंदम सील यांच्यावर तिने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
बंगाली डिजिटल वेबसाईट एबीपीला दिलेल्या मुलाखतीत रूपंजना मित्राने हा खुलासा केला आणि सगळीकडे खळबळ माजली. मुलाखतीत रूपंजना तिच्या आयुष्यातील चढऊताराबद्दल बोलली. शिवाय मीटू मोहिमेवरही तिने भाष्य केले.
तिने सांगितले की, अरिंदम सील यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये ‘भूमिकन्या’ या मालिकेच्या पहिल्या भागाची स्क्रिप्ट वाचण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार, संध्याकाळी मी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि ऑफिसात कुणीही नव्हते. अरिंदम एकटे ऑफिसमध्ये होते. मी मनातून घाबरले होते. अचानक अरिंदम आपल्या जागेवरून उठले आणि माझ्या बाजूला येऊन बसले. त्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवण्यास सुरुवात केली. ऑफिसमध्ये आम्ही दोघेच होतो. मी भीतीने थरथरत होते. काही वेळानंतर त्यांचे वागणे मला असह्य झाले आणि मी धीर एकवटून त्यांना विरोध केला.
फक्त स्क्रिप्टबद्दल बोलायचे असेल तर बोला, असे त्यांना निक्षून सांगितले. आपले वागणे हिला आवडले नाही, हे अरिंदम यांना कळले असावे. ते तडक तिथून बाजूला झाले आणि स्क्रिप्टबद्दल बोलू लागले. काही क्षणात त्यांची पत्नी तिथे आली आणि मी सुटले. हा सगळा प्रकार माझ्यासाठी प्रचंड धक्कादायक होता. मला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता.
आरोपाचे खंडन
दरम्यान अरिंदम यांनी रूपंजनाच्या या आरोपांचे खंडन केले आहे. हा काही राजकीय स्टंट असू शकतो. मला माहिती नाही की रूपंजना हे कशासाठी करत आहे. आम्ही जुने मित्र आहोत. ती ज्या दिवशीची गोष्ट करत आहे. त्या भेटीनंतर तिने स्वत: मला ‘काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे’, असा मॅसेज केला होता. अजूनही तो मॅसेज माझ्याकडे आहे आणि मी तो कुणालाही दाखवू शकतो. जर मी तिच्यासोबत गैरवर्तन केले असेल तर ती मला मॅसेज का करेल? असा सवालही त्यांनी केला.