वडिलांच्या प्रचारासाठी केली होती दिवस-रात्र एक, पराभवामुळे अभिनेत्रीला बसला धक्का, भावुक पोस्ट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 01:03 PM2024-06-05T13:03:06+5:302024-06-05T13:04:04+5:30
नेहा शर्माचे वडील अजीत शर्मा यांना भागलपुरच्या जनतेने संधी दिली नाही.
Bhagalpur Results 2024 : लोकसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काही नेत्यांनी विजयाची पतका फडकावली. तर काहीच्या पदरी पराभव आला. लोकप्रिय अभिनेत्री नेहा शर्मा हिच्या वडिलांनी काँग्रेसच्या तिकीटावर भागलपुर मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण, त्यांचा दारुण पराभव झाला. या पराभवाबद्दल नेहा शर्मा हिने प्रतिक्रिया दिली आहे.
नेहा शर्माचे वडील अजीत शर्मा यांना भागलपुरच्या जनतेने संधी दिली नाही. वडिलांच्या पराभवाचा अभिनेत्रीला धक्का बसला. निवडणूक निकालानंतर नेहा शर्मा हिनं भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहलं, "आमच्यासाठी कठीण दिवस होता, पण आम्ही चांगली लढत दिली. ज्यांनी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना मत दिले. त्यांची मी आभारी आहे. आम्ही पुढील वाटचालीसााठी तयार आहोत. प्रत्येकाने लक्षात ठेवावं की, आपला विजय कधीही न हरण्यात नसून नेहमी पुढे जाण्यात आहे'.
नेहा हिनं पुढे काही ओळी लिहल्या, 'सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो। तुम निडर डरो नहीं, तुम निडर डटो वहीं। वीर तुम बढ़े चलो! धीर तुम बढ़े चलो! #BhagalpurLoksabha'. नेहाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नेहा शर्माने भागलपूर लोकसभा मतदारसंघातून वडिलांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील अजीत शर्मा यांच्या प्रचारासाठी आले होते. पण, तरीही भागलपूर मतदारसंघातून एनडीए उमेदवार अजय कुमार मंडल विजयी झाले.
नेहा शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलीकडेच कोर्टरूम ड्रामा 'Illegal 3' मध्ये दिसली होती. या सीरिजचे दिग्दर्शन साहिर रझा यांनी केलं आहे. यात अक्षय ओबेरॉयसह कुब्ब्रा सैत, आशिमा वरदान, इरा दुबे यांच्या भूमिका आहेत. सध्या नेहातिच्या आगामी सस्पेन्स थ्रिलर '36 डेज' च्या रिलीजची तयारी करत आहे.