"...म्हणून मुलींना मी फार जवळ करत नाही", सलमान खाननं अभिनेत्री भाग्यश्रीला सांगितली होती मनातली गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:25 PM2023-02-23T15:25:43+5:302023-02-23T15:26:21+5:30
सलमानने भाग्यश्रीसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या ज्याचा खुलासा आता अभिनेत्रीने केला आहे.
Sakman Khan : 90 च्या दशकात आलेल्या 'मैने प्यार किया' (Maine Pyar Kiya) या सिनेमाने तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. यातील सलमान-भाग्यश्रीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. आजही या सिनेमाची जादू कायम आहे. कोणताच बोल्ड सीन नाही ना कोणता गाजावाजा पण तरी त्यांची प्रेम आणि सुमनच्या गोड लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आज ३३ वर्षांनंतर भाग्यश्रीने एका मुलाखतीत सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाग्यश्रीने सलमानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
सलमानने भाग्यश्रीसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या ज्याचा खुलासा आता अभिनेत्रीने केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, 'खरं तर सलमान मुलींच्या मागे नाही तर मुलीच सलमानच्या मागे लागतात. सिनेमाच्या शूटिंगवेळी तो म्हणाला होता की चांगल्या मुलींनी माझ्या प्रेमात पडू नये अशी माझी इच्छा आहे. मला नाही वाटत मी चांगला मुलगा आहे. मला नाही वाटत की मी एका मुलीसोबत बराच काळ राहू शकेल.मला खूप लवकर कंटाळा येतो. जोवर मी यावर नियंत्रण मिळवत नाही तोवर लोकांनी माझ्यापासून दूर राहावं असं मला वाटतं. म्हणूनच मी अनेक मुलींना जवळ येऊ देत नाही.'
भाग्यश्री पुढे म्हणाली, 'आज सलमानकडे बघितले तर समजते की तो तेव्हा खरंच बोलत होता. सिनेमाच्या प्रमोशनसाठी फोटोशूट सुरु असताना एका प्रसिद्ध फोटोग्राफरने सलमानला बाजूला नेले आणि सांगितले की फोटोशूट दरम्यान तिला मध्येच किस कर. त्यांना आमचे काही सेन्सेशनल फोटो घ्यायचे होते. ' हे ऐकून सलमानने स्पष्ट नकार दिला होता. सलमानचे उत्तर ऐकून माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला होता.'
सलमान खानविषयी बोलायचे तर खरोखरंच सलमानने कधीच कोणाही अभिनेत्रीला ऑनस्क्रीन किस केलेले नाही. सलमानने दिलेला शब्द आजतागायत पाळला आहे.