ही अभिनेत्री म्हणतेय, माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाहीये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:03 PM2019-10-14T12:03:27+5:302019-10-14T12:17:24+5:30
ही अभिनेत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागताना दिसत आहे.
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बन्सलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहा प्रचंड रडत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ती रडत आपली समस्या सगळ्यांना सांगत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागताना दिसत आहे.
नेहा या व्हिडिओद्वारे तिच्या पतीने तिला कशाप्रकारे वागणूक दिली हे सांगताना दिसत आहे. नेहाचे सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 29 मार्च 2019 ला लग्न झाले असून तिच्या पतीने लग्नानंतर तिला प्रचंड मारहाण केली असल्याचे ती सांगत आहे. तसेच अनेकवेळा त्याने तिच्या घरात येऊन तोडफोड केली असे देखील ती सांगताना दिसत आहे.
या व्हिडिओद्वारे ती सांगत आहे की, मला आई-वडील नाहीत. त्यामुळे माझा नवरा आणि त्याचे कुटुंब हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझा नवरा अमेरिकेतील असून आमच्या लग्नाला सहा महिने झाले तरी तो मला त्याच्या घरी पुन्हा घेऊन जाण्यास तयार नाहीये. गेल्या सहा महिन्यांपासून तो मला केवळ खोटी आश्वासनं देत आहे. मला तुझ्यासोबत घेऊन जा, असे मी त्याला सतत म्हणत असल्याने तू काहीही कर... मला कायद्यांची भीती वाटत नाही असे तो मला सांगत आहे आणि तो आता लवकरच अमेकिरेला परत जाणार आहे. मला या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मी गेल्या तीन दिवसांपासून सतत पोलिस स्टेशनला जात आहे. मी आता सगळ्या आशा सोडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी मदत करावी. कारण या लग्नासाठी मी माझी सगळी प्रॉपर्टी विकली आहे. माझ्या सासरकडची मंडळी देखील नवऱ्याला मदत करत असून माझी सासू, नणंद आणि तिचा मती मला माझ्या नवऱ्याला भेटू देत नाहीयेत. या सगळ्यात काय करावे हेच मला कळत नाहीये. माझा नवरा मला सोडून गेला तर माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाहीये. माझ्या नवऱ्याला अमेरिकेला जाण्यापासून थांबवावे ही विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत आहे.