निर्ल्लजांनो, लाज विकून खाल्ली का? सुशांतच्या आत्महत्येवरचे गाणे बघून संतापली राणी चॅटर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:54 PM2020-06-18T14:54:26+5:302020-06-18T15:00:04+5:30
अशा लोकांमुळेच भोजपुरी सिनेमा हास्याचा विषय बनत आला आहे, अशा शब्दांत राणी चॅटर्जीने तिचा संताप व्यक्त केला.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने प्रत्येकजण दु:खी आहे. चाहते, कलाकारांनी सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूवर शोक केला आहे. बॉलिवूडच नाही तर भोजपुरी कलाकारांनीही सुशांतच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. अशात भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी हिला इंटरनेटवर असे काही दिसले की, ती भडकली. सुशांतला विचित्र व असंवेदनशीलपणे श्रद्धांजली देण्याचा प्रकार सहन न झाल्याने तिने सोशल मीडियावर आपला संताप बोलून दाखवला.
एका भोजपुरी गायकाने सुशांतच्या निधनावर गाणे बनवले. ‘सुशांत फसरी लगा लिहले’ असे शब्द असलेले हे गाणे सोशल मीडियावर शेअरही करण्यात आले. राणी चॅटर्जीला हे गाणे बघून संताप अनावर झाला. इतका की, हे गाणे बनवणा-यांना तिने चांगलेच फैलावर घेतले.
‘लाज विकून खाल्ली का या लोकांनी? निर्लज्जांनो थोडी तर लाज बाळगा. स्वत:च्या मेहनतीने नाव कमवा ना. दुस-याच्या मृत्यूचा फायदा घेऊन नाव कमावून काय फायदा. कलाकारांच्या नावावर असे लोक कलंक आहेत. यावर एकही भोजपुरी कलाकार चकार शब्द काढणार नाही. अशा लोकांमुळेच भोजपुरी सिनेमा हास्याचा विषय बनत आला आहे. आपण शांत राहतो आणि अशा लोकांचे फावते,’ अशा शब्दांत राणी चॅटर्जीने तिचा संताप व्यक्त केला.
सुशांतच्या मृत्यूवर बनवलेल्या या गाण्याचा शैल सिंह संगम याने आवाज दिला आहे. गाण्याच्या पोस्टरवर त्याचे नाव लिहिलेले आहे.
सुशांतने गेल्या रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.