अश्लिल गाण्यात महात्मा गांधींचे नाव; भोजपुरी गायिकेविरोधात एफआयआर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:32 PM2020-03-18T12:32:59+5:302020-03-18T12:33:53+5:30
आचरटपणा भोवला...
भोजपुरी गायिका अंतरा सिंग प्रियंका हिला आपल्या गाण्यात महात्मा गांधींचे नाव घेणे चांगलेच महागात पडले. होय, एका अश्लिल गाण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर केल्याप्रकरणी तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. झारखंडची राजधानी रांची येथे झालेल्या कार्यक्रमात गायिका अंतरा सिंग प्रियंकाने आपल्या एका अश्लील गाण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर केला. यावर आक्षेप नोंदवत छोटानागपुर खादी ग्राम उद्योगने मंगळवारी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.
प्रियंकाचे गाणे केवळ अश्लिलच नाही तर या गाण्यात तिने महात्मा गांधी यांचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा देशाच्या महापुरुषाचा अपमान असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अंतरा सिंग प्रियंका ही भोजपुरी गायिका आहे.तिने अनेक हिट भोजपुरी गाणी गायली आहेत. पण आता या प्रकणात नाव आल्याने तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी ‘बुलाती हैं मगर जाने का नहीं’ या गाण्यामुळे अंतरा सिंग प्रियंका खूपच चर्चेत आली होती. उर्दूमधील प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा ‘बुलाती हैं मगर जाने का नहीं’ हा शेर आहे. याचे साँग व्हर्जन सगळीकडे खूप व्हायरल झाले होते. या शायरीवर भोजपुरी दोन गायिकांनी गाणे गायले होते. हे गाणे प्रचंड व्हायरल झाले होते.