एका नावामुळे पडली मौसमी-रेखाच्या मैत्रीत फूट; 'त्या' सिनेमानंतर पुन्हा कधीच आल्या नाहीत एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:44 PM2023-08-02T14:44:35+5:302023-08-02T14:45:15+5:30
Actress cat fight: या दोघींची खूप जुनी आणि चांगली मैत्री होती. मात्र, त्यांच्या मैत्रीत मोठी फूट पडली.
सौंदर्य आणि अभिनय कौशल्य यांच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रेखा. प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येणाऱ्या रेखाची प्रेमप्रकरणं विशेष गाजली. मात्र, सध्या नेटकऱ्यांमध्ये तिच्या आणि अभिनेत्री मौसमी चटर्जीच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे. या दोघींनीही एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. परंतु, एका कारणामुळे या दोघींच्या मैत्रीत कायमची फूट पडली.
१९६६ मध्ये रंगुला रत्नम या तेलुगू सिनेमातून रेखाने कलाविश्वात पदार्पण केलं. तर त्याच काळात मौसमी चटर्जीने लग्नानंतर तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मौसमीने 'बालिका वधू' या बंगाली सिनेमातून १९६७ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हळूहळू करत दोघींनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दोघींनीही अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. परंतु, भोलाभाला या सिनेमाच्या वेळी दोघींमध्ये वादाची ठिणगी पडली.
१९७८ मध्ये भोलाभाला हा सिनेमा प्रदर्शित झाला. सत्यपाल यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.राजेश खन्ना, जगदीप, देवेन वर्मा यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा, त्यातील गाणी बॉक्स ऑफिसवर गाजली. त्याचसोबत मौसमी आणि रेखा यांच्यातील वादही गाजला.
कशामुळे झाला नेमका वाद?
भोलाभाला सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या दोघींमधील वाद सुरु झाला. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी मौसमीपूर्वी रेखाचं नाव दिलं होतं. ही गोष्ट मौसमीला अजिबात आवडली नाही.तिने मीडियासमोर याविषयीचा राग व्यक्त केला. इतकंच नाही तर आपल्या पुढे असलेलं रेखाचं नाव काढून टाकावं यासाठी तिने निर्मात्यांवर दबावही टाकला होता. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. याविषयी तिला मुलाखतीमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने हे वृत्त फेटाळून लावलं होतं. सोबतच, "मला इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रसिद्धीची भूक नाही. माझा माझ्या नावावर, कामावर विश्वास आहे. जोपर्यंत कामाचा संबंध आहे, मला वाटतं मी मर्यादा ओलांडलेली नाही. तरीही त्यापूर्वी माझं नाव देणं आवश्यक आहे. यात काही नुकसानदेखील नाही," असं ती म्हणाली.
पुढे ती म्हणते, "जेव्हा सिनेमात दोन नायिका असतात त्यावेळा इच्छा नसतानाही काही गोष्टी आपोआप निर्माण होतात. दिग्दर्शकांना न्याय देता आला असता तर असं भांडण झालं नसतं. पण असे निर्माते-दिग्दर्शक फारच कमी असतात जे इतरांचे दडपण न स्वीकारता आपल्या मनाप्रमाणे काम करतात. म्हणूनच मी भविष्यात दोन नायिकांच्या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे."