Bholaa Movie Review : कसा आहे अजय देवगणचा 'भोला' चित्रपट? तिकिट काढण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: March 30, 2023 04:13 PM2023-03-30T16:13:36+5:302023-03-30T16:15:03+5:30

Bholaa Movie Review : जाणून घ्या कसा आहे, अजय देवगणचा 'भोला' चित्रपट

Bholaa Movie Review : How is Ajay Devgn's 'Bhola' movie? Read this review before booking | Bholaa Movie Review : कसा आहे अजय देवगणचा 'भोला' चित्रपट? तिकिट काढण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Bholaa Movie Review : कसा आहे अजय देवगणचा 'भोला' चित्रपट? तिकिट काढण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : अजय देवगण, तबू, संजय मिश्रा, दीपक डोब्रियाल, गजराज राव, विनीत कुमार, मकरंद देशपांडे, केतन करंडे, अर्पित राणा, किरण कुमार
दिग्दर्शक : अजय देवगण
निर्माते : अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, एस. आर. प्रकाशबाबू, एस. आर. प्रभू, रिलायन्स एन्टरटेन्मेंट
शैली : अॅक्शन-थ्रिलर
कालावधी : दोन तास २४ मिनिटं
स्टार - अडीच स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे

हा चित्रपट 'कैथी' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'यु मी और हम', 'शिवाय' व 'रनवे ३४' या चित्रपटांनंतर अजय देवगणनं 'भोला' दिग्दर्शित केला आहे. पहिले दोन चित्रपट पूर्णत: फ्लॅाप झाल्यानंतर 'रनवे ३४'मध्ये अजयचं दिग्दर्शन कौशल्य सुधारल्याचं जाणवलं. त्यामुळे वाढलेल्या अपेक्षा 'भोला' शंभर टक्के पूर्ण करू शकलेला नाही. 'भोला'च्या रूपात केवळ व्हिएफएक्सच्या पटलावरील 'अ'वास्तव चित्र पहायला मिळतं.

कथानक : आयपीएस डायना जोसेफ जीवावर उदार होऊन अंमली पदार्थांचा मोठा साठा पकडते. यात ती जखमीही होते. जप्त केलेला माल ती कुठे ठेवते हे कोणालाच माहिती नसतं. मालाच्या शोधात असलेल्या मालकाच्या ती प्रतीक्षेत असते. मोठ्या ऑफिसरच्या निवृत्तीच्या पार्टीत उपस्थित सर्व पोलिस अधिकारी औषध मिसळलेलं मद्य पिऊन बेशुद्ध होतात. त्यांना रुग्णालयात नेण्याची जबाबदारी जखमी डायनावर येते, पण ट्रक चालवणं तिला जमणार नसतं. अशातच पोलिसांनी पकडलेल्या भोलावर तिची नजर पडते. भोलाला घेऊन ती पोलिस अधिकाऱ्यांचा जीव वाचवण्याच्या मोहिमेवर निघते. या वाटेत त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : पटकथेच्या नावाखाली चित्रपटात काहीच नाही. संवादही सामान्य दर्जाचे आहेत. सुरुवातीच्या दृश्यापासून अखेरपर्यंत केवळ अॅक्शन, अॅक्शन आणि अॅक्शनच आहे. वडील आणि मुलीच्या नात्यातील भावनिक अँगल चांगला आहे. हे वगळता व्हिएफएक्सनं ओतप्रोत भरलेल्या या चित्रपटात कपाळाला भस्म फासून, ढिगाने चिकन खाऊन, एका वेळी कितीही लोकांची धुलाई करण्याची क्षमता असलेला भोला यात दिसतो. नक्कल करायलाही अक्कल लागते असं म्हणतात ते खोटं नाही. कल्पनेच्या पलिकडले फाईट सिक्वेन्स डोकं बधीर करतात. दीपक डोब्रियालसारख्या हरहुन्नरी कलाकाराला खलनायकी रूपात पहायला मिळणं आणि त्याचं जीव ओतून काम करणं आणि अॅक्शन-व्हिएफएक्स या जमेच्या बाजू आहेत. गीत-संगीतही सामान्य आहे. भोलाला पाहून वाघानं पळ काढणं जरी अतिच वाटतं. 

अभिनय : अजय देवगणनं आपल्या नेहमीच्याच शैलीत अभिनय केला आहे. भोलाच्या भूमिकेला न्याय देण्याचा त्याने प्रयत्न केला असला तरी साऊथचे सर्वच फॉर्म्युले हिंदीत चालू शकणार नाहीत हे तो विसरला. तबूनं साकारलेली डॅशिंग लेडी पोलिस अधिकारी मनाला भावते. अंशूच्या रूपात दीपक डोब्रियाल आहे यावर सुरुवातीला विश्वासच बसत नाही. त्याने अफलातून खलनायक साकारला आहे. मराठमोळा मकरंद देशपांडे व सागर करंडेसह गजराज राव, विनीत कुमार आदींनी चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : अभिनय, रंगभूषा, वेशभूषा, व्हिएफएक्स, अॅक्शन
नकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, सादरीकरण, गीत-संगीत, संकलन, कला दिग्दर्शन
थोडक्यात : टायटलप्रमाणे हा चित्रपट मात्र मुळीच भोळा नसलेला व अखेरीस मी पुन्हा येईन म्हणणारा हा चित्रपट पहायचा की नाही हे प्रत्येकानं ठरवावं.

Web Title: Bholaa Movie Review : How is Ajay Devgn's 'Bhola' movie? Read this review before booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.