Bhool Bhulaiya 2 Movie Review: मंजूलिका पुन्हा घेऊन आली विनोदाचा तडका, पैसा वसूल आहे कार्तिक आर्यनचा 'भुलभुलैया २'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:48 PM2022-05-20T15:48:08+5:302022-05-20T16:08:31+5:30
Bhool Bhulaiya 2 Movie Review:१५ वर्षांनी बनलेल्या 'भुलभुलैया'च्या सीक्वलमध्ये रहस्याच्या थराराराला विनोदाची किनार जोडण्यात आली आहे. जाणून घ्या कसा आहे, कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बूचा 'भुलभुलैया २'
कलाकार : कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू, अमर उपाध्याय, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजपाल यादव, मिलिंद गुणाजी, राजेश शर्मा, अमर उपाध्याय, सिद्धांत घेगडमल
दिग्दर्शक : अनीस बज्मी
कालावधी : २ तास २३ मिनिटे
स्टार - तीन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे
१५ वर्षांनी बनलेल्या 'भुलभुलैया'च्या सीक्वलमध्ये रहस्याच्या थराराराला विनोदाची किनार जोडण्यात आली आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी हॉरर-कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुलवण्याचा प्रयत्न केला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या जोडीची केमिस्ट्री, तब्बूचा अभिनय आणि संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजपाल यादव यांची प्रसंगानुरुप कॉमेडी हे या चित्रपटाचे प्लस पॅाइंट्स आहेत. केवळ हॉररचा भडीमारा न करता मनोरंजक मूल्यांचा ताळमेळ साधत बज्मी यांनी रहस्यमय कथानकाला विनोदाची फोडणी देत प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असं सर्व काही यात दिलं आहे.
कथानक :
एका प्रवासादरम्यान रुहान आणि रीत या दोघांची ओळख होते. रीतला रुहान तिच्याबद्दलच्या खासगी गोष्टी सांगून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो, पण रीतही त्याची चोरी पकडते. त्यानंतर दोघांची मैत्री होते. राजस्थानमधील गावी स्वत:च्या लग्नासाठी निघालेल्या रीतला रुहान ती बस सोडून देण्यास सांगून, एका संगीत महोत्सवाला नेतो. रीत ज्या बसने गावी जाणार असते तिचा अपघात होतो. रीतचं निधन झाल्याचं कुटुंबियांना वाटतं. या दरम्यान रीतला आपल्या बहिणीबाबतचं एक रहस्य समजतं. त्यामुळं तीसुद्धा जिवंत असल्याची बातमी लपवून ठेवते. यासाठी ती रुहानची मदत घेते. रुहानला घेऊन ती गावातील आपल्या जुन्या भुताच्या हवेलीत पोहोचते. त्यानंतर रहस्य आणि विनोदाचा लपंडाव सुरू होतो.
लेखन दिग्दर्शन :
आकाश कौशिक यांनी लिहिलेली पटकथा अखेरपर्यंत खिळवून ठेवते. याशिवाय फरहाद सामजी यांच्या साथीनं त्यांनी केलेलं संवादलेखनही हास्याची कारंजी फुलवतं. या चित्रपटात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं परीपूर्ण पॅकेज देता येईल याची पुरेपूर काळजी बज्मी यांनी घेतली आहे. चित्रपटात खरोखर भूताचा थरार पहायला मिळेल की नाही? हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. यात भूतही आहे, भूताला जखडून ठेवणारा मांत्रिकही आहे आणि मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारा पंडीतही आहे. याही पेक्षा या सर्वांचे मुखवटे दूर करणारा नायक लक्ष वेधून घेतो. त्याचा हजरजबाबीपणा भल्याभल्यांची बोलती बंद करतो. चित्रपटाचा मध्यंतरापूर्वीचा भाग विनोदी आहे. मध्यंतरानंतरच्या भागात रहस्याचा खेळ असला तरी तो काहीसा रेंगाळल्यासारखा वाटतो. क्लायमॅक्सला पुन्हा आपली गती कायम राखतो. बऱ्याच ठिकाणी बंगाली भाषेचा वापर करण्यात आला आहे, पण हिंदी सब टायटल्स असल्यानं अडचण येत नाही. कला दिग्दर्शन, कॅास्च्युम, गेटअप, मेकअप, कॅमेरावर्क या सर्व जमेच्या बाजू आहेत. गीत-संगीतही चांगलं आहे. टायटल साँग प्रेक्षकांच्या पसंतीस अगोरदच उतरलेलं आहे.
अभिनय :
कार्तिकनं साकारलेला रुहान आजवर साकारलेल्या कॅरेक्टर्सपेक्षा खूप वेगळा आहे. आजच्या पिढीतील बेधडक तरुणाची भूमिका कार्तिकनं चांगल्या प्रकारे साकारली आहे. काही ठिकाणी तो ओव्हरअॅक्टींग करतो असं वाटेल, पण कदाचित ती त्या व्यक्तिरेखेची गरज असू शकेल. कियारासोबत त्याची जोडी शोभून दिसते. कियारानं रीतच्या भूमिकेत रंग भरताना सत्य समजल्यावर केवळ आपल्या बहिणीसाठी कुटुंबियांचा रोष ओढवून घ्यायला तयार होणारी तरुणी यशस्वीपणे साकारली आहे. तब्बूनं साकारलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा अफलातून आहेत. या चित्रपटात तब्बूची वेगळीच रूपं पहायला मिळतात. संजय मिश्रा, राजपाल यादव आणि अश्विनी काळसेकर या त्रिकूटाची कॉमेडी छान रंगली आहे. या तुलनेत मिलिंद गुणाजी, अमर उपाध्याय यांना फार काम नाही. राजेश मिश्रा आणि बालकलाकार सिद्धांत घेगडमल यांनीही चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : क्लायमॅक्मसमध्ये कथानक थेट ३६० डिग्री फिरतं आणि आश्चर्याचा धक्का देणारं सत्य समोर येतं. कलाकारांचा अभिनय आणि इतर तांत्रिक बाजू उत्तम आहेत.
नकारात्मक बाजू : भूत-प्रेतांवर विश्वास नसणाऱ्यांना हा चित्रपट आवडणार नाही. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये फार लॅाजिक शोधण्याचा प्रयत्न केला गेला तर निराशा होईल.
थोडक्यात :
भूत-प्रेत, तंत्र-मंत्र, काळी जादू-जादूटोणा या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण हॅारर आणि कॉमेडीचा संगम अनुभवण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी पहायला हरकत नाही.