खबरदार..! कोरोनाची दुसरी लाट ठरू शकते जीवघेणी, भूमी पेडणेकरची लोकांना कळकळीची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:48 PM2021-07-13T17:48:19+5:302021-07-13T17:52:12+5:30
भूमी कोविड वॉरियर हा सोशल मीडिया उपक्रम चालवते आणि आजाराने ग्रस्त लोकांना मदत करते.
दुसऱ्या लाटेनंतर देशाच्या लोकांना आणखीन खबरदारी का घ्यावी लागेल यावर बोलताना अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली, “अजून गोष्टी सहज घेण्याची वेळ आलेली नाही,” दुसऱ्या लाटेमुळे भारतावर प्राणघातक संकट ओढवले होते, ज्यामुळे देश जणूकाही पॅरलाइज्ड झाला आहे. भूमी नागरीकांना त्यांचा धीर न सोडण्याची कळकळीने विनंती करत आहे. कोविड-19च्या केसेसच्या संख्येत जरी घट होत असली तरी, आपण अजूनही महामारीच्या मध्यावरच आहोत आणि केसेसमध्ये होणारी वाढ टाळण्यासाठी आपल्याला आणखी जास्त सजग रहावे लागणार असल्याची भूमी लोकांना वारंवार आठवण करुन देत आहे.
भूमी कोविड वॉरियर हा सोशल मीडिया उपक्रम चालवते आणि आजाराने ग्रस्त लोकांना मदत करते, ती म्हणाली, ”विषाणू कुठेही गेलेला नाही. जीवनावर अजूनही या संकटाचे सावट कायम आहे, त्यामुळे आपल्याला जबाबदारीने वागावे लागणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे योगदान देण्याचे व भारताला पुन्हा रुळावर येण्यासाठी मदत करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे आपण एकजुटीने आपल्या देशासाठी काहीतरी करुया.”
ती पुढे म्हणते, ”आपण ही देखील समजले पाहिजे की, खबरदारी पाळल्यामुळे आपण मार्च 2020 पासून दररोज कार्यरत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना देखील दिलासा देत आहोत. आपल्याला हे समजून घ्यावेच लागेल की त्यांना सुध्दा कुटुंब आहे. आपण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देखील जोखमीमध्ये घालत आहोत. जबाबदारीने वागून, आपण आरोग्य संरचनेला देखील मदत करणार आहोत."
देशातल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि विषाणूच्या प्रसारावर लक्ष देण्यासाठी शिफारस केलेल्या पध्दतींचा अवलंब करावा अशी भूमीची इच्छा आहे.
ती म्हणते, ”आपण या महामारीच्या मध्यावर आहोत आणि आता गाफिल राहून चालणार नाही. जरी महामारी असली तरी आपल्या सर्वांना काम तर करावेच लागणार आणि कुटुंबाकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे, पण आपण सामाजिक अंतर राखणे, हात धुणे, त्यांना सॅनिटाइझ करणे नियमितपणे करण्याबद्दल आणि बाहेरुन घरी आल्यावर शिफारस केलेल्या पध्दतींचे अनुसरण करण्याबद्दल जागरुक असले पाहिजे. आपण नक्कीच प्रयत्नपूर्वक विषाणूला दूर ठेवू शकतो असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.