सनी देओलच्या 'गदर ३' संदर्भात मोठी माहिती आली समोर, शूटिंगला लवकरच होणार सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:52 PM2024-01-19T17:52:45+5:302024-01-19T17:54:07+5:30
'गदर'च्या निर्मात्यांनीही 'गदर ३' (Gadar 3) बनवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच तारा सिंगची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडचा सुपर डुपर हिट चित्रपट 'गदर-एक प्रेम कथा'(Gadar Movie)ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. तारा सिंगची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलचा हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. 'गदर २' (Gadar 2) हा चित्रपट प्रदर्शित होऊन २२ वर्षांनंतर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. गदरप्रमाणे या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धमाका केला. दरम्यान, सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. गदर फ्रँचायझीच्या निर्मात्यांनीही गदर ३ (Gadar 2) बनवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच तारा सिंगची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, गदर आणि गदर २चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर ३ बनवण्याची पुष्टी केली आहे. त्याची कथाही लॉक केली आहे. झी स्टुडिओने या चित्रपटाला हिरवा कंदिल दिला आहे. पिंकविलाने सूत्रांच्या माहितीनुसार, झी स्टुडिओ, अनिल शर्मा आणि सनी देओल यांच्यातील पेपरवर्कही पूर्ण झाले आहे. गदर २ रिलीज झाल्यानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांची टीमही गदर ३ बनवण्याच्या विचारात होती.
दोन्ही चित्रपटांपेक्षा 'गदर ३' असणार धमाकेदार
गदर ३ हा चित्रपटही भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आणि धमाकेदार असेल असे निर्मात्यांनी सांगितले आहे. यामध्येही जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर या चित्रपटाचे शूटिंग २०२५ मध्ये सुरू होऊ शकते. अनिल शर्मा सध्या त्याचा आगामी चित्रपट 'जर्नी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्यांची मुले उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'बॉर्डर'चाही सिक्वेल येणार
सनी देओलच्या बॉर्डर या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल देखील बनवला जाणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा धमाका केला की आजपर्यंत लोक ते विसरलेले नाहीत. बॉर्डर व्यतिरिक्त सनी देओल सध्या लाहोर: १९४७च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.