'बिग बॉस' फेम शहनाज गिल रुग्णालयात दाखल, लाईव्ह येत म्हणाली, "सगळ्यांची वेळ येते..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 09:07 AM2023-10-10T09:07:01+5:302023-10-10T09:08:09+5:30
शहनाझ गिल अनेक दिवसांपासून फिल्म प्रमोशनमध्ये व्यस्त होती.
'बिग बॉस'मुळे चर्चेत आलेली सर्वांची लाडकी शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या 'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा तिचा दुसरा बॉलिवूड सिनेमा आहे. सिनेमातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. गेल्या काही दिवसांपासून शहनाज फिल्मच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी दिसत होती. दरम्यान शहनाझला काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले होते. तोच तिने रुग्णालयातून इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत आपल्या तब्येतीचे अपडेट दिले.
शहनाझ गिल अनेक दिवसांपासून फिल्म प्रमोशनमध्ये व्यस्त होती. याचवेळी तिच्या खाण्यात असं काही आलं ज्यामुळे तिला इन्फेक्शन झालं. हे इन्फेक्शन इतकं वाढलं की तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं. शहनाजने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांना काळजी न करण्याचं आवाहन केलं. तसंच हे सगळं इन्फेक्शन झाल्यामुळे आहे अशीही माहिती दिली.
व्हिडिओत शहनाज रुग्णालयातील बेडवर झोपली आहे. चाहत्यांशी संवाद साधताना ती म्हणाली, "हे बघा वेळ प्रत्येकाचीच येते आणि जाते. माझ्यासोबतही तेच झालंय. मी आता ठीक आहे. मला इन्फेक्शन झालं होतं. मी सँडविच खाल्लं होतं. मला फूड इन्फेक्शन झालं आहे. मला माहित होतं जर मी लाईव्ह आले तर मला सहानुभूती मिळेल."
शहनाज रुग्णालयात असल्याची बातमी कळताच चाहत्यांनी तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली. तसंच लाईव्ह व्हिडिओवर कमेंट करत तिला काळजी घेण्याची विनंती केली. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज सावरली आहे आणि तिच्या आयुष्यात पुढे जात आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये आपला जम बसवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र कितीही यशस्वी झाली तरी तिचा साधेपणा नेहमीच टिकून असतो. तिचा हाच स्वभाव चाहत्यांना प्रभावित करतो.
शहनाजचा 'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमा नुकताच रिलीज झालाय. अनिल कपूरची लेक रिया कपूर सिनेमाची निर्माती आहे. तिने देखील रुग्णालयात जाऊन शहनाजची भेट घेतली आणि तिची विचारपूस केली. शहनाजवर सध्या उपचार सुरु असून लवकरच तिला डिस्चार्ज मिळेल.