सलमानला रिप्लेस करणार रितेश देशमुख? हिंदी बिग बॉस होस्ट करण्याबाबत स्वत:च दिली माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 14:14 IST2024-07-16T14:13:25+5:302024-07-16T14:14:22+5:30
नुकतंच रितेश देखमुखनं सिद्धार्थ कननला मुलाखत दिली.

सलमानला रिप्लेस करणार रितेश देशमुख? हिंदी बिग बॉस होस्ट करण्याबाबत स्वत:च दिली माहिती...
'बिग बॉस' हा देशभरातील लोकांचा आवडता कार्यक्रम आहे. टेलिव्हिजन आणि ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या 'बिग बॉस' हिंदीचं होस्टिंग सलमान खान करतो. पण, यंदा सलमान खान हा सिंकदर सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्यानं तो होस्टिंगसाठी वेळ देऊ शकत नाहीये. 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व अभिनेता अनिल कपूर होस्ट करत आहेत. तर मराठीत 'बिग बॉस'चं होस्टिंग महेश माजरेंकर करतात. पण, यंदा रितेश देशमुख मराठी 'बिग बॉस'चं पाचवं पर्व होस्ट करणार आहे. यातच आता मराठी बिग बॉसच्या होस्टची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रितेश हिंदीतही होस्टिंग करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यावर खुद्द रितेशनेच उत्तर दिलं आहे.
नुकतंच रितेश देखमुखनं सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यावेळी त्याला मराठीनंतर आता बिग बॉस हिंदीतही सलमानला रिप्लेस करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. या प्रश्नावर रितेशने दिलेल्या उत्तराने सर्वाचं लक्ष वेधलं आहे. रितेशने म्हटलं की, मला हे माहितेय आणि तुम्हालाही हे माहिती असायला हवं की सलमान खानला बिग बॉसमध्ये कोणीही रिप्लेस करु शकत नाही. सलमान हा एकमेव आहे आणि तो आयकॉनिक आहे'.
रितेश 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर आहेच. पण, यासोबतच त्याने ओटीटी माध्यमात पदार्पण केलं आहे. त्याची 'पिल' ही वेबसीरिज जिओ सिनेमा प्रिमियमवर प्रदर्शित झाली आहे. 'पिल'मध्ये रितेश देशमुख प्रकाश चौहान या भूमिकेत दिसतोय. या सीरिजमध्ये भारतातील फार्मास्युटिकल जगताविषयी अनेक रहस्य दडली आहेत. या रहस्यांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न प्रकाश चौहान करताना दिसतोय. 'पिल' ही रोमांचक आणि थराराक वेबसीरिज आहे.
महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मराठी बिग बॉसची (Bigg Boss Marathi) ओढ लागली आहे. 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व २८ जुलैपासून भेटीला येत आहे. या पर्वाचे प्रोमो समोर आले आहेत. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसतो आहे. या प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश पाहायला मिळतो आहे. 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सीझन गाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार आहे.