'कर्माची फळं' म्हणणाऱ्या मिका सिंहला बिपाशाचं उत्तर, पोस्ट शेअर करत म्हणाली- "दुसऱ्यांना दोष देणारे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:33 IST2025-03-03T13:33:08+5:302025-03-03T13:33:31+5:30
मिका सिंहच्या या वक्तव्यानंतर बिपाशाने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

'कर्माची फळं' म्हणणाऱ्या मिका सिंहला बिपाशाचं उत्तर, पोस्ट शेअर करत म्हणाली- "दुसऱ्यांना दोष देणारे..."
बॉलिवूड सिंगर मिका सिंहने अभिनेत्री बिपाशा बासूबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बिपाशा गेल्या बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय दिसत नाहीये. लेकीच्या जन्मानंतर बिपाशाचे चाहते तिच्या कमबॅकची वाट पाहत होते. मात्र ती संसारात रमली आहे. पण, बिपाशाला काम मिळत नसल्याने ती स्क्रीनवरुन गायब आहे आणि ही तिच्या कर्माची फळं आहेत, असं मिका सिंह नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता. मिका सिंहच्या या वक्तव्यानंतर बिपाशाने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. "टॉक्सिक लोक गोंधळ निर्माण करतात, दुसऱ्यांकडे बोट दाखवतात, दुसऱ्यांना दोष देतात आणि जबाबदारी घेणं टाळतात", असं बिपाशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढे ती म्हणते, "नकारात्मकता आणि टॉक्सिसिटीपासून दूर राहा. दुर्गा दुर्गा". मिका सिंहच्या वक्तव्यानंतर बिपाशाच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काय म्हणाला होता मिका सिंह?
"देव सगळं बघत आहे. मला करण खूप आवडायचा. त्याला घेऊन मला सिनेमा प्रोड्युस करायचा होता. याचं बजेट जवळपास ४ कोटी होतं. बिपाशाला मी घेणार नव्हतो पण ती बळजबरी या सिनेमाचा भाग बनली. मला दुसऱ्याच अभिनेत्रीला घ्यायचं होतं. पण बिपाशा स्वत: आली. लंडनमध्ये सिनेमाचं शूट होतं. ४ कोटींचं बजेट १४ कोटींवर गेलं. मला आर्थिक चिंता होती. बजेट वाढण्याचं खरं कारण सेटवर आल्यावर मला कळालं. बिपाशा अजिबातच सहकार्य करत नव्हती. तिचे नखरे पाहून मला निर्मितीमध्ये यायचा पश्चात्ताप होत होता. नवरा बायको असूनही त्यांनी रोमॅन्टिक सीन्स द्यायलाही नकार दिला."
"यामध्ये एक किसींग सीन होता. हा कथेचाच भाग होता. पण बिपाशाने ऐनवेळी नकार दिला. अमुक करणार नाही तमुक करणार नाही हेच तिचं सुरु होतं. ज्या अभिनेत्रींजवळ काम नाही ते नेहमीच नशिबाला दोष देतात. पण जे काम घेऊन आलेत त्या निर्मात्यांचाही आदर केला पाहिजे. आज तिला तिच्या कर्माचंच फळ मिळत आहे म्हणून घरी बसली आहे."
बिपाशा बसूने २०२० साली 'डेंजरस' ही वेबसीरिज केली होती. हीच सीरिज मिका सिंहने निर्मित केली होती ज्यात करण सिंह ग्रोवरही होता. त्यानंतर बिपाशा कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही.