Birthday Special : - म्हणून आशा पारेख यांनी घेतला कधीही लग्न न करण्याचा निर्णय...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 08:00 AM2019-10-02T08:00:00+5:302019-10-02T08:00:02+5:30
अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (2 ऑक्टोबर) वाढदिवस...
बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या आशा पारेख यांनी चाहत्यांना वेड लावले. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. जगाच्या पाठीवर असंख्य चाहते निर्माण केलेत. पण ख-या आयुष्यात मात्र त्या कायम एकट्या राहिल्या. अखेर असे काय झाले की, आशा पारेख यांनी आजन्म अविवाहित राहणे पसंत केले?
आशा पारेख यांचे मानाल तर लग्न त्यांच्या नशिबातच नव्हते. खुद्द आशा यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. आशा यशाच्या शिखरावर होत्या. बॉलिवूडची एक दिग्गज हिरोईन अशी त्यांची प्रतीमा होती. या अभिनेत्रीला भेटणे वा तिच्यापर्यंत पोहोचणे सोपे नाही, असेच मानून कदाचित कुणीही आशा यांना लग्नाची मागणी घातली नाही. याचमुळे आशा अविवाहित राहिल्या. पण खरे सांगायचे तर असे नव्हते. आशा यांच्या आयुष्यात एकमेव व्यक्ती आली आणि ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची व्यक्ती ठरली. याच व्यक्तिमुळे त्या आजन्म अविवाहित राहिल्या.
होय, बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खानचे काका आणि दिग्गज निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर आशा यांचे प्रेम होते. (आज नासिर हुसैन हे या जगात नाहीत.)
आशा व नासिर हुसैन यांचे दीर्घकाळ अफेअर होते. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. आशा प्रेमात पडल्या त्यावेळी नासिर साहेब विवाहित होते. नासिर यांनी संसार मोडून आपल्याशी लग्न करावे, हे आशा यांना मान्य नव्हते. त्याचमुळे दोघांनी लग्न केले नाही. पुढे आशा यांनी कधीच लग्न केले नाही.
आशा पारेख यांनी एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. नासिर साहेब हे माझ्या आयुष्यात आलेले पहिले आणि शेवटचे पुरुष होते. त्यांच्यावर माझे खूप प्रेम होते. पण मला त्यांचे घर तोडायचे नव्हते. माझ्या आणि त्यांच्या कुटुंबात कधीच मतभेद झाले नाहीत. मला कधीच त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांपासून विभक्त करायचे नव्हते. याच भीतीमुळे मी कधी त्यांच्यासोबत लग्न केले नाही. माझे लग्न व्हावे, ही माझ्या आईची इच्छा होती. तिने माझे लग्न व्हावे, म्हणून प्रयत्नदेखील केले होते. पण मला माझ्या आवडीच्या व्यक्तीसोबतच लग्न करायचे होते. तसे होऊ शकले नाही. म्हणून मी आयुष्यभर लग्नच केले नाही, असे त्यांनी सांगितले होते.