Birthday Special : आयुष्यमान खुराणा खऱ्या आयुष्यातही होता ‘विकी डोनर’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 09:01 AM2018-09-14T09:01:27+5:302018-09-14T09:03:36+5:30
आयुष्यमान खुराणा आजघडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. ‘विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल सावधान’पर्यंत त्याच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले. आज(१४ सप्टेंबर) आयुष्यमानचा वाढदिवस.
आयुष्यमान खुराणा आजघडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. त्याच्याकडे आज कामाची कमतरता नाही. ‘विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल सावधान’पर्यंत त्याच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले. आज(१४ सप्टेंबर) चाहत्यांच्या लाडक्या आयुष्यमानचा वाढदिवस. १४ सप्टेंबर १९८४ रोजी त्याचा जन्म झाला होता.
आयुष्यमान हा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुष्यमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता.
२०१२ मध्ये त्याचे नशिब फळफळले आणि त्याला ‘विकी डोनर’ मिळाला. ‘विकी डोनर’नंतर आयुष्यमानच्या करिअरची गाडी रूळावर धावू लागली. यानंतर ‘नौटंकीसाला’, ‘बेवकूफियां’, ‘हवाईजादा’ हे चित्रपट त्याने केलेत. पण हे चित्रपट दणकून आपटले आणि आयुष्यमानच्या करिअरला करकचून ब्रेक लागला. पुढे करिअरची गाडी पुन्हा सुरू होण्यासाठी त्याला २०१५ ची प्रतीक्षा करावी लागली. यावर्षी ‘दम लगा के हईशा’ आला. चित्रपट हिट झाला आणि आयुष्यमानच्या करिअरची गाडी सूसाट पळत सुटली.
‘विकी डोनर’ या चित्रपटात आयुष्यमानने स्पर्म डोनरची भूमिका साकारली आहे. पण फार क्वचित लोकांना ठाऊक आहे की, हा अभिनेता ख-या आयुष्यातही ‘विकी डोनर’ आहे. होय, २००४ मध्ये त्याने पहिल्यांदा ख-या आयुष्यातही स्पर्म डोनेट केले होते. एका मुलाखतीत त्याने स्वत: याचा खुलासा केला होता. माझ्या वडिलांना मी सांगितले होते. आईलाही सांगितले, पण तिला समजावणे कठीण होते, असे आयुष्यमान म्हणाला होता.
आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
आयुष्मान एक चांगला गायक आणि गीतकारही आहे. ‘विकी डोनर’मधील पानी दा रंग हे गाणे आयुष्यमानने स्वत: लिहिले होते, शिवाय स्वत:च ते गायले होते.