Birthday Special : मीना कुमारी कॅमेऱ्यासमोर लपवायची डावा हात, कारण जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:00 AM2021-08-01T08:00:00+5:302021-08-01T08:00:07+5:30

Meena Kumari Birthday : मीना कुमारीचं नाव आठवलं तरी डोळ्यांपुढं उभा राहतो तो बोलक्या डोळ्यांचा एक सुंदर चेहरा....

birthday special controversy of meena kumari life story | Birthday Special : मीना कुमारी कॅमेऱ्यासमोर लपवायची डावा हात, कारण जाणून थक्क व्हाल

Birthday Special : मीना कुमारी कॅमेऱ्यासमोर लपवायची डावा हात, कारण जाणून थक्क व्हाल

googlenewsNext
ठळक मुद्देमीनाकुमारीचे यश दिवसेंदिवस वाढू लागले तसे तिचे व्यसनही. ती पूर्णत: व्यसनाच्या आधीन झाली होती. पुढे  31 मार्च1972 रोजी मीना कुमारीने जगाचा निरोप घेतला.  

मीना कुमारीचं (Meena Kumari ) नाव आठवलं तरी डोळ्यांपुढं उभा राहतो तो बोलक्या डोळ्यांचा एक सुंदर चेहरा. आपल्या निखळ सौंदर्याने आणि अदाकारीने सिनेप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मीना कुमारीचा आज वाढदिवस. होय, ‘दिल अपना प्रीत पराई’ मधली नर्स करूणा, ‘दिल एक मंदिर’ची सीता, ‘मेरे अपने’ मधील आई शिवाय पाकिजा, परिणीता अशासगळ्या भूमिका मीना कुमारीने ताकदीने उभ्या केल्या आणि अजरामर केल्या. 
 मीना कुमारीचा जन्म हा 1 ऑगस्ट 1933 रोजी मुंबई मध्ये झाला होता. वडील हे मास्टर अली बख्श मुस्लिम होते तर त्यांची आई ही बंगाली ख्रिश्चन होती. मीनाकुमारीच्या आई वडिलांनी तिचे नाव हे महजबीन ठेवले होते.

मीनाकुमारी ही आईवडिलांची दुसरी मुलगी होती. ती जन्मली आणि दुसरीही मुलगी झाली म्हणून वडील कमालीचे दु:खी झालेत. त्यात आर्थिक परिस्थितीही बेताची. अशात आईवडिलांनी जन्मताच मीना कुमारीला मुस्लिम अनाथालयात सोडून दिलं. अर्थात पोटच्या गोळ्याला सोडून देणं इतकं सोपं नसल्यामुळे काही तासांतच त्यांनी पुन्हा तिला घरी आणलं. वडिलांना मुलगी नाही तर मुलगा  मुलगा हवा होता. पण नियतीचा डाव उलटा पडला होता. पुढे मीना कुमारीच्या अख्ख्या आयुष्यातही नियतीचे सगळे डाव उलटे पडत गेले.
मीना कुमारीने अगदी लहानपणीच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 1939 प्रदर्शित झालेल्या ‘लेदरफेस’ या सिनेमात ती  बालकलाकार म्हणून झळकली होती.
पुढे नायिका म्हणून रूपेरी पडद्यावर ती झळकली आणि तिच्या रूपानं प्रेक्षकांना मोहिनी टाकली आणि बघता बघता ती बॉलिवूडची ‘ट्रॅजिडी क्वीन’ बनली. जणू अंतर्मनातील वेदना तिनं पडद्यावर साकार केली.  


 
म्हणून लपवायच्या डावा हात...
मीना कुमारीचे सिनेमे बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येईल. ती म्हणजे ती आपला डावा हात पडद्यावर लपवून ठेवायची. याचे कारण होते एक अपघात.   21 मे 1951 ला महाबळेश्र्वरहून मुंबईला परतताना मीनाकुमारी यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. डाव्या हाताची करंगळी तुटून वाकडी झाली होती. त्यामुळं मीना कुमारी कायम कॅमे-यासमोर आपला डावा हात ओढणीने लपवून ठेवायची.

या अपघातानंतर मीना कुमारी व कमाल अमरोही यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती.  होय, मीना कुमारी अपघात गंभीर जखमी झाल्यानंतर तिला रूग्णालयात भरती करण्यात आले. जखमी मीना कुमारीला पाहायला कमाल अमरोही रूग्णालयात पोहोचले. यावेळी मीना कुमारीच्या लहान बहिणीने तिची कमाल यांच्याकडे तक्रार केली. आपा तो मोसंबी का ज्यूस नहीं पी रहीं है, असे बहिणीने सांगितले. यावर कमाल यांनी केवळ नजर वर करून मीना कुमारींकडे पाहिले आणि काय कमाल, मीना कुमारीने एका घोटात मोसंबीचा ज्यूस संपवला. यानंतर कमाल दर आठवड्याला मुंबईत पुण्याला मीना कुमारीला भेटायला येऊ लागले. इथून या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. 

कमाल यांची आधीच दोन लग्ने झाली होती. ते तीन मुलांचे बाप होते. अशात मीना कुमारी व त्यांचे नाते मीनाच्या वडिलांना मान्य नव्हते. पण मीना कुमारीला जगाची पर्वा नव्हती. त्या अपघातानंतर मीना कुमारी आपल्या बहिणीसोबत रोज एका मसाज क्लिनिकमध्ये जायची. 14 फेब्रुवारी 1952 रोजी दोघी बहिणींना वडिलांनी क्लिनिकमध्ये सोडून दिले. पण मीना कुमारी तिथून थेट कमाल अमरोहींजवळ पोहोचली. काजी आधीच तयार होता. अगदी दोन तासांत दोघांचा निकाह झाला. अर्थात 1964 येईपर्यंत हे जोडपे विभक्त झाले होते. त्यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले होते.

कमाल अमरोही यांच्या नावाचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता. अशावेळी मीना कुमारी त्यांच्या प्रेमात पडली होती.  कमाल अमरोही हे  जिद्दी, जातिवंत कलाकार होते. त्यांच्या कामात कोणी लुडबूड केलेली त्यांना अजिबात सहन होत नसे.   कमाल अमरोहींनी त्यांची पहिली पत्नी आणि मुलांना गावी पाठवून मीनाकुमारीसोबत संसार सुरु केला.

सुरुवातीची काही वर्षे सुखाची गेली. पण नंतर कमाल यांच्या तापट स्वभावामुळे  त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळेनासे झाले. याऊलट   मीनाकुमारी यशाच्या पाय-या चढू लागली. यातच मीनाकुमारीचे स्वच्छंदी वर्तन त्यांच्यातील वादाला कारण ठरू लागले. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मीनाकुमारीला यश खुणावत होते.  यातच तिला दारूचे व्यसन जडले. कमाल अमरोहींची बंधने तिला नकोशी वाटू लागली आणि एक दिवस कमाल अमरोहीचा सोन्याचा पिंजरा सोडून ती बाहेर पडली.  यामुळे  ‘पाकिजा’ चित्रपट अर्धवट राहिला होता. दोघेही एकमेकांसोबत काम करण्यास तयार नसताना सुनील दत्त व नर्गिस यांनी दोघांना कसेबसे राजी केले आणि नाखुशीने का होईना कमाल व मीना कुमारी यांनी ‘पाकिजा’ पूर्ण केला. तोपर्यंत मीनाकुमारीचे यश दिवसेंदिवस वाढू लागले तसे तिचे व्यसनही. ती पूर्णत: व्यसनाच्या आधीन झाली होती. पुढे  31 मार्च1972 रोजी मीना कुमारीने जगाचा निरोप घेतला.  
  

Web Title: birthday special controversy of meena kumari life story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.