बर्थ डे बॉय फरदीन खानचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून म्हणाल WOW, फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:11 PM2021-03-08T14:11:36+5:302021-03-08T14:12:07+5:30
बॉलिवूड अभिनेता फरदीन खान गेल्या अनेक वर्षांपासून ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे. आज फरदीनचा वाढदिवस...
बॉलिवूड अभिनेता फरदीन खान गेल्या अनेक वर्षांपासून ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे. 2016 नंतर फरदीन बॉलिवूडमधून जणू गायब झाला. मध्यंतरी तो पुन्हा दिसला पण त्याला पाहून लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. होय, वाढलेल्या वजनामुळे त्याला ओळखताही येईना. आता पुन्हा एकदा फरदीनला पाहून लोक थक्क आहेत. फरदीन पुन्हा एकदा पूर्वीरखा फिट झाला आहे. आज फरदीनचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊ या त्याचा ‘फॅट टू फिट’चा अनुभव...
काही वर्षांपूर्वी फरदीनचे वजन खूप वाढले होते. वयापेक्षा तो अधिक म्हातारा दिसू लागला होता. यावरून लोकांनी त्याला ट्रोलही केले होते. अलीकडे एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत फरदीन यावर बोलला होता. ‘वजन वाढले होते. म्हणायला मी चाळीशीत होतो, पण माझे मलाच जणू मी 70 वर्षांचा झालो आहे, असे वाटू लागले होते. थोडे चाललो तरी धाप लागायची. लोकांच्या नजरा मला छळायच्या. घराबाहेर पडलो तरी लोक मला चिडवत असल्याचे वाटायचे. पण एक दिवस यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि जिममध्ये ट्रेनिंग सुरु केले. वजन कमी करायचेच, हाच एक ध्यास बाळगला आणि 35 किलो वजन घटवले, ’ असे फरदीनने सांगितले होते.
1998 साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे फरदीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. फरदीनच्या वडिलांनी म्हणजे फिरोज खान यांनीच हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. अगदी पदार्पणालाच फरदीनच्या वाट्याला फ्लॉप सिनेमा आला. यानंतर यशाची चव चाखायला त्याला 2000 सालची वाट पाहावी लागली. 2000 साली रिलीज झालेल्या ‘जंगल’ या सिनेमाने फरदीनला ओळख दिली. या चित्रपटातील फरदीनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. बॉक्स आॅफिसवरही हा सिनेमा हिट झाला. पण यानंतर 2001 साल उगवता उगवता फरदीन एका वादात सापडला.
होय, 2001 साली फरदीनला कोकेन खरेदी करताना रंगेहात पकडले गेले. यानंतर त्याला अटकही झाली. पाठोपाठ रिहॅब सेंटरमध्ये त्याची रवानगी झाली. या प्रकरणाने अनेक वर्षे फरदीनचा पाठपुरावा केला. अखेर 2012 साली त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली.
लव्ह के लिए कुछ भी करेगा, ओम जय जगदीश, हे बेबी, ऑल द बेस्ट अशा अनेक सिनेमात फरदीनने काम केले. पण अचानक का कुणास ठाऊक त्याने चित्रपटांतून ब्रेक घेतला. यानंतर अनेक वर्षे तो बॉलिवूडमधून गायब झाला.