कोट्याधीश नाही अब्जाधीश, मिथुन चक्रवर्ती यांच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:16 PM2021-06-16T12:16:41+5:302021-06-16T12:16:58+5:30
Mithun Chakraborty Birthday : ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस. मिथुन आज त्यांचा 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty ) यांचा आज वाढदिवस. मिथुन आज त्यांचा 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मिथुन चक्रवर्तींनी आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. अभिनयात येण्याआधी मिथुन दा एका नक्षलवादी समूहात होते. मात्र एका अपघातात भावाचं निधन झालं आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी मिथुन यांच्या खांद्यावर आली. यामुळे मिथुन यांनी नक्षलवाद सोडला आणि ते कुटुंबाकडे परतले.पुण्यातील फिल्म इंस्टीट्यूटमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. 1976 साली मिथुन यांनी ‘मृगया’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. अर्थात 90 चे दशक त्यांच्यासाठी कसोटीचे ठरले. (Mithun Chakraborty networth property)
फ्लॉप झाले 33 सिनेमे
1993 ते 1998 या काळात मिथुन दा यांनी अनेक सिनेमे साईन केलेत. मात्र एकापाठोपाठ एक असे 33 सिनेमे फ्लॉप झालेत. इतके सिनेमे फ्लॉप झाल्यावर कुणीही नाऊमेद होईल. पण मिथुन त्याला अपवाद ठरले. 33 सिनेमे फ्लॉप होऊनही त्यांनी 12 नवे सिनेमे साईन केले. 2004 -2005 या काळात त्यांनी दुसरी इनिंग सुरु केली. वीर, लक, गोलमाल 3, हाऊसफुल 2, खिलाडी 786 अशा सिनेमात त्यांनी काम केले.
संपत्तीच्या बाबतीत म्हणाल तर ते शाहरूख-अक्षयलाही लाजवतील. होय, मिथुन यांचा लक्झरी हॉटेलचा बिझनेस आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे सुमारे 258 कोटींची प्रॉपर्टी आहे. ऊटी येथे त्यांचे मोनार्क नावाचे लक्झरी हॉटेल आहे. या हॉटेलात 59 खोल्या, 4 लक्झरी फर्निश्ड सुइट्स, हेल्थ फिटनेस सेंटर व इनडोर स्वीमिंग पूल अशा सुविधा आहेत. म्हैसूर येथेही त्यांचे अलिशान हॉटेल आहे. अन्य शहरातही यांच्या मालकीची हॉटेल्स आहेत.
मुंबईत त्यांचे दोन बंगले आहेत. वांद्रे येथे एक आणि मड आयलँड येथे दुसरा. ऊटी येथेही त्यांचा बंगला आहे. अलिशान गाड्यांचे म्हणाल तर फॉक्सवॅगन, फोर्ड एंडेवर, टोयोटा फॉर्च्युनर शिवाय 1975 मॉडल मर्सिडिज बेंज अशा गाड्या त्यांच्याकडे आहेत.
मिथुन यांना पाळीव कुत्र्यांचा प्रचंड लळा आहे. त्यांच्याकडे एक-दोन नाहीत तर 76 कुत्री आहेत. यांच्यासाठी खास एसी रूम बनवण्यात आली आहे. ऊटीच्या बंगल्यावर त्यांनी 38 कुत्री पाळली आहेत.