Birthday Special : १२ वीत पास झाल्यानंतर अभिनेत्री रिमा करत होत्या बँकेत काम, तिथेच सुरू झाली होती लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 06:33 PM2019-06-21T18:33:23+5:302019-06-21T18:33:54+5:30
बॉलिवूडची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची आज जयंती असून आजही त्या रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत.
बॉलिवूडची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची आज जयंती असून आजही त्या रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. त्यांनी १८ मे, २०१७ साली जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे फक्त बॉलिवूडच नाही तर मराठी सिनेसृष्टीदेखील हळहळली होती.
रिमा लागू यांचे लग्नापूर्वीचं नाव नयन भदभदे होते. त्यांची आई मंदाकिनी भदभदे मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. बालपणापासूनच रिमा आपल्या आईला परफॉर्म करताना पाहत मोठ्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना देखील अभिनयाची आवड निर्माण झाली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, मला आईसारखे कलाकार बनायचे होते. बारावीचा निकाल लागल्यानंतर मी घरातील सर्वांना सांगितले होते की पुढचे शिक्षण करणार नाही. माझ्या वडीलांना पुढे शिकवायचे होते. पण मी त्यांचे ऐकले नाही.
स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी त्या नाटकांसोबत बँकेत नोकरी करत होत्या. एका मुलाखतीत रिमा लागू यांचा एक्स नवरा विवेक लागू यांनी त्यांची प्रेमकथा सांगितली होती. ते म्हणाले होते की, १९७६ची गोष्ट आहे. त्यावेळी मी २३ वर्षांचा होतो आणि रिमा १८ वर्षांची होती. आम्ही दोघे बँकेत नोकरी करत होतो आणि आम्हाला दोघांनाही नाटकात काम करण्याचे वेड होते. या गोष्टीमुळेच आमच्यात पहिली मैत्री झाली आणि मग प्रेम. दोन वर्षानंतर लग्न केले.
लग्नाच्या काही वर्षांनंतर रिमा व विवेक लागू विभक्त झाले. विवेक यांच्यानुसार त्या दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
घटस्फोटानंतर रिमा लागू यांनी मुलगी मृण्मयीची कस्टडी त्यांच्याकडे घेतली होती. मृण्मयी नाटक व चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. यासोबत ती थिएटर दिग्दर्शकदेखील आहे.