Birthday Special शाहरुखचा संघर्ष...त्याच्याच शब्दांत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2016 11:21 AM2016-11-02T11:21:26+5:302016-11-06T10:44:22+5:30
बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान याचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. शाहरुख आज ५१ वर्षांचा झाला. २ नोव्हेंबर १९६५ रोजी एका ...
शाहरुखचा संघर्ष...त्याच्याच शब्दांत...
बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान याचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. शाहरुख आज ५१ वर्षांचा झाला. २ नोव्हेंबर १९६५ रोजी एका निम्न मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेला शाहरुख एकदिवस बॉलिवूडवर ‘राज’ करेल, असा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. शाहरुखकडे आज सगळे काही आहे. पैसा, प्रसिद्धी, कुटुंब अगदी सगळं काही. पण हे मिळवण्यासाठी शाहरुखने अपार कष्ट उपसले आहेत. मोठा संघर्ष केला आहे. शाहरुखच्या आयुष्यात अनेक संकटे आलीत, पण त्याने त्यासमोर गुडघे टेकले नाहीत. त्याच्या आयुष्याविषयी...त्याच्याच शब्दांत....
एका मुलाखतीत शाहरुखने हा प्रसंग सांगितला होता...
‘माझे वडिल मला एकदा सिनेमा पाहायला घेऊन गेले. मात्र त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते. त्यामुळे आम्ही कमानी आॅडिटोरियमजवळ बसलो आणि रस्त्यावरून जाणाºया गाड्यांकडे पाहणे किती अद्भूत आहे, असे ते मला म्हणाले. खरे तर ते मला सिनेमा दाखवणार होते. पण त्यांनी मला दाखवल्या त्या रस्त्यावरच्या गाड्या. मी जर माझ्या मुलांना सिनेमा पाहायला नेत असेल तर मला त्याला सिनेमाचा दाखवायला हवा. रस्त्यांवरच्या गाड्या नाहीत...’
विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना शाहरुखने एक गोष्ट प्रामाणिकपणे कबुल केली होती. तो म्हणाला होता...
‘आयुष्यात मी एकाच गोष्टीला घाबरतो. ते म्हणजे अपयश. गरिबीमुळे मी अनेकदा अनेक गोष्टींना मुकलो. अपयश सोसले. घराचे भाडे द्यायला पैसे नव्हते म्हणून आम्हाला रस्त्यावर काढले गेले. मला गरिबीची भीती वाटते. यामुळे कधीकधी मला कमालीचा ताण येतो...’
शाहरुखची पहिली कमाई किती होती? शाहरुख याबद्दल सांगतो...
माझी पहिली कमाई केवळ ५० रुपए होती. दीड हजार रुपए घेऊन मी मुंबईला आलो होतो. मुंबई राहायला जागा नव्हती. त्याकाळात अभिनेता आणि निर्माता विवेक वासवानी याने मला राहण्यासाठी जागा दिली होती. दिल्लीत आयोजित पंकज उदास यांच्या एका कन्सर्टमध्ये काम करून मी ५० रुपए कमावले होते. अभिनेता म्हणून ‘दिल आशना है’ साईन केली तेव्हा त्यासाठी मला ५० हजार मानधन मिळाले होते. पण ‘दिवाना’ रिलीज झाला अन् माझे जगच बदलले.