Birthday special : ना मतभेद, ना वाद तरीही पतीपासून 25 वर्षे वेगळ्या राहिल्या अलका याज्ञिक; पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 08:00 AM2020-03-20T08:00:00+5:302020-03-20T08:00:02+5:30
आज अलका यांचा वाढदिवस
अलका याज्ञिक म्हणजे बॉलिवूडच्या लोकप्रिय पार्श्वगायिका. आज अलका यांचा वाढदिवस( २० मार्च). यानिमित्त जाणून घेऊ यात, अलका यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...
कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. 1972 पासून त्या आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने गात. वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईमध्ये दाखल झालेल्या अलका यांना वयाच्या 14 व्या वर्षीच पहिला ब्रेक मिळाला आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
एका भेटीत राज कपूर यांना अलका यांचा आवाज अतिशय आवडला. त्यांनी अलकांची लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत भेट घालून दिली. यानंतर १९८० मध्ये ‘पायल की झंकार’ या चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून गाण्याची संधी अलका यांना मिळाली. यावेळी त्या केवळ 14 वर्षांच्या होत्या.
यानंतर आठ वर्षांनी आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातील माधुरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आलेले ‘एक, दो, तीन...; हे गाणे अलका यांना मिळाले आणि या गाण्याने अलका यांना एक नवी ओळख दिली. यानंतर गायिका म्हणजे अलका याज्ञिक असे समीकरण जणू रूढ झाले. आपल्या 30 वर्षांच्या करिअरमध्ये अलकांनी 700 चित्रपटांत 20 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.
अलका अनेक वर्षांपासून पती नीरज कपूर यांच्यापासून वेगळ्या राहतात. पण वेगळे राहूनदेखील त्यांचे नाते आणि प्रेम टिकून आहे. दोघांची एक मुलगी असून सायशा तिचे नाव आहे. सायशा अलकासोबत राहते.
अलका यांनी 1989 साली नीरज कपूर यांच्यासोबत लग्न केले. मात्र गेल्या 25 पेक्षा अधिक वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. कुठल्या मतभेदामुळे वा वादामुळे नाही तर एका वेगळ्या कारणासाठी.
होय, नीरज व अलका दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील. अलका बॉलिवूडच्या दिग्गज गायिका तर नीरज बिझनेसमॅन. साहजिकच लग्नानंतर अलका मुंबईत राहायच्या तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे. अलका कामातून जसा वेळ मिळेल तशा शिलाँग जात असत, तर कधी कधी नीरज मुंबईत येत. अनेक वर्षे हा ‘सिलसिला’ चालला. यादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. अखेर अलका यांनीच पतीला शिलाँगमध्ये परतून आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा ‘लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप’ दोघांच्याही वाट्याला आले. तेव्हापासून नीरज व अलका वेगवेगळे राहतात. अर्थात त्यांच्यात एक वेगळे बॉन्डिंग आहे. प्रेम आजही कायम आहे.