Birthday Special : तर या दिग्गज मराठमोळ्या गायकासोबत झाले असते माधुरी दीक्षितचे लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:14 AM2019-05-15T11:14:05+5:302019-05-15T11:14:58+5:30
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा आज (१५ मे) वाढदिवस. आपल्या सुमधूर हास्याने आणि सौंदर्याने घायाळ करणा-या माधुरीचा चार्म अद्यापही कायम आहे. म्हणूनच आजही तिच्या सौंदर्याचे लाखो लोक दिवाने आहेत.
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा आज (१५ मे) वाढदिवस. आपल्या सुमधूर हास्याने आणि सौंदर्याने घायाळ करणा-या माधुरीचा चार्म अद्यापही कायम आहे. म्हणूनच आजही तिच्या सौंदर्याचे लाखो लोक दिवाने आहेत.
१५ मे १९६७ साली मुंबईमध्ये माधुरी दीक्षित हिचा जन्म झाला. शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या पोटी जन्मलेल्या माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याची तिची इच्छा होती. याशिवाय तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याचीही इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जोडीदार डॉक्टरच निवडला.
माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. पण त्याआधी माधुरीच्या माता-पित्यांनी तिच्यासाठी बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध मराठमोळ्या गायकाचे स्थळ पाहिले होते. अर्थात त्या गायकाने नकार दिला आणि हे लग्न होता होता राहिले. त्या गायकाने होकार दिला असता तर कदाचित माधुरीने या गायकासोबत लग्नगाठ बांधली असती. हा गायक कोण माहित आहे? तर या गायकाचे नाव होते सुरेश वाडकर.
होय,सिनेमांत काम करण्यापेक्षा माधुरीने लग्न करून संसार करावा अशी तिच्या आई-वडिलाची इच्छा होती. म्हणून माधुरीसाठी वर संशोधनाचे काम त्यांनी सुरु केले होते. एकीकडे माधुरीला सिनेमांमध्ये काम करण्याची स्वप्न पडत होती तर दुसरीकडे तिचे आई- बाबा मात्र तिच्यासाठी मुलं शोधत होते. याचदरम्यान, माधुरीच्या वडिलांनी लग्नासाठी दिग्गज गायक सुरेश वाडकर यांना लग्नासाठी विचारले.
बॉलिवूडमध्ये सुरेश वाडकर हे तेव्हा नवोदित गायक म्हणून नावारुपास येत होते. माधुरीच्या आई- वडिलांना सुरेश यांना मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवला. पण सुरेश वाडकर यांनी या स्थळाला थेट नकार दिला. माधुरी फार बारीक असल्याचे कारण त्यांनी दिले. या नकाराने माधुरीच्या आई- वडिलांना अपार दु:ख झाले होते. एक चांगले स्थळ हातचे गेले, असेच इतर आईवडिलांप्रमाणे त्यांना वाटत होते. पण या नकाराने माधुरीचा मात्र फायदा झाला. यानंतर तिच्या आई- वडिलांनी तिला सिनेमात काम करण्याची परवानगीही दिली.
१९८४ मध्ये ‘अबोध’ सिनेमातून माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र माधुरीला लगेच लोकप्रियता मिळाली नाही. जवळपास चार वर्षांनंतर ‘तेजाब’ सिनेमाने तिला खरी ओळख मिळाली. या सिनेमानंतर माधुरीने मागे वळून पाहिले नाही.
माधुरीने त्यानंतर राम लखन, परिंदा, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके हैं कौन, राजा आणि दिल तो पागल है या सारख्या सुपरहिट सिनेमांत काम केले. नुकताच माधुरीचे ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झालेत.