असा झाला ‘हिरो’चा ‘व्हिलन’! म्हणून बॉलिवूड सोडून धरला टीव्हीचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 02:30 PM2020-04-12T14:30:00+5:302020-04-12T14:30:02+5:30
आज तेज सप्रू यांचा वाढदिवस
‘मोहरा’ या चित्रपटातील इरफान नावाचा गुंड आठवतो? होय, तेज सप्रू यांनी ही भूमिका साकारली होती. बॉलिवूडमधील घा-या डोळ्यांच्या या अभिनेत्याने अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या. आज तेज सप्रू यांचा वाढदिवस. आज त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
5 एप्रिल 1955 रोजी जन्मलेले तेज सप्रू यांचे वडील डी के सप्रू, आई हेमवती आणि बहीण प्रीती सप्रू सगळेच हिंदी सिनेमात काम करणारे. एकंदर काय तर तेज यांना घरातून अभिनयाचा वारसा मिळाला.
तेज प्रभू यांना खरे तर अॅक्टिंगमध्ये फार रूची नव्हती. त्याऐवजी क्रिकेट आणि बॅडमिंटन हे खेळ त्यांचा जीव की प्राण होते. पण योगायोगाने ते हिंदी सिनेमाचे हिरो बनले आणि पुढे खलनायक.
होय, ‘सुरक्षा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक रविकांत यांना हिरो हवा होता. यात चित्रपटात दोन हिरो होते. एक होता मिथुऩ पण दुसरा हिरो काही मिळेना. अशात वडिलांनी एकदिवस तेज यांना बोलवले आणि रविकांत यांना भेटण्यास सांगितले. पित्याच्या इच्छेखातर तेज रविकांत यांना भेटायला गेलेत आणि त्यांना पाहताच हाच माझ्या चित्रपटाचा दुसरा हिरो असणार, असे रविकांत यांनी तिथल्या तिथे जाहीर करून टाकले. येथून तेज यांचा अॅक्टिंगचा प्रवास सुरु झाला.
पण यानंतर एक दोन चित्रपटांत हिरो बनल्यानंतर अचानक त्यांना व्हिलनच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. 1979 मध्ये ‘सुरक्षा’ हा तेज यांचा पहिला रिलीज झाला आणि यानंतर काहीच महिन्यात पित्याचे निधन झाले. पित्याच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी तेज यांच्या खांद्यावर आली आणि मनात नसतानाही त्यांना मिळेल त्या भूमिका स्वीकाराव्या लागल्या. म्हणजे, व्हिलन बनण्याची वेळ त्यांच्यावर आली. अगदी बरोबरीच्या अभिनेत्यांचा मुलगा बनण्याची वेळ त्यांच्यावर आली. पुढे याचमुळे तेज यांनी हिंदी सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीत तेज यांनी याबद्दल सांगितले होते. घरच्या जबाबदारीमुळे व्हिलनच्या भूमिका करण्याची वेळ माझ्यावर आली. अनेक सिनेमांमध्ये वयाने माझ्या बरोबरीच्या अभिनेत्यांचा मुलगा बनून मला कॅमे-यापुढे उभे राहावे लागले. प्रेम चोप्रा, परेश रावल, गुलशन ग्रोव्हर हे सगळे पांढरे केस लावून कॅमे-यापुढे उभे होत आणि मी त्यांचा मुलगा बनून अॅक्शन करत असे. यामुळे मी हिंदी सिनेमे न करण्याचा निर्णय घेतला आणि टेलिव्हीजनकडे वळलो. पण मला त्याचे जराही दु:ख नाही़. 13 भाषांमधील अनेक चित्रपटांत मी काम केले, याचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले होते.