डेब्यूआधी हृतिकच्या हाताचं सहावं बोट कापण्याचा निर्णय झाला, ऑपरेशनही ठरलं, पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 11:38 AM2021-01-10T11:38:19+5:302021-01-10T11:39:32+5:30
बॉलिवूडचा डान्सिंग व अॅक्शन स्टार हृतिक रोशन याचा आज वाढदिवस.
बॉलिवूडचा डान्सिंग व अॅक्शन स्टार हृतिक रोशन याचा आज वाढदिवस. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून हृतिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटाने त्याला ‘स्टार’ केले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज जगभरात त्याचे चाहते आहे. हृतिकने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती त्यावेळी तो त्याच्या सहाव्या बोटामुळे चर्चेत होता. हातांना 10 नव्हे तर 11 बोटं असल्यामुळे तो एकेकाळी फार चर्चेत होता.
वडील राकेश रोशन यांनी हृतिकला लॉन्च करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे हे एक्स्ट्रा फिंगर एक समस्या ठरली होती. कारण चित्रपटातील डान्स, हँडशेक अशा सीन्समध्ये त्याचे हे एक्स्ट्रा फिंगर लपवून लपणार नव्हते. अशावेळी शस्त्रक्रिया करून हृतिकचे एक्स्ट्रा फिंगर काढून टाकण्याचा निर्णय झाला होता. हृतिकही तयार होता. पण पुढे त्याने हा निर्णय बदलला कारण काय तर त्याची आई.
एक्स्ट्रा फिंगरमुळे हृतिकला फार त्रास सहन करावा लागला होता. शाळेत असताना हृतिकचे मित्र एक्स्ट्रा फिंगरवरून त्याची टिंगल करायचे. त्यामुळे शाळेमध्ये त्याला आपण इतरांपेक्षा वेगळे वाटायचे. मित्रांच्या सततच्या चिडवण्यामुळे हृतिक त्या मित्रांपासून लांबच राहायचा.
पुढे बॉलिवूडमध्ये एन्ट्रीची वेळ आली, तेव्हा हे एक्स्ट्रा फिंगर त्याच्यासाठी पुन्हा त्रासदायक ठरू लागले आणि शस्त्रक्रिया करून ते काढून टाकण्याचे हृतिकने ठरवले.
अतिरिक्त अंगठा कापण्याच्या निर्णयावर त्याने वडील राकेश रोशन यांच्याशी चर्चा केली. ऑपरेशन ठरले, पण ऐनवेळी हृतिकची आई पिंकी रोशन यांनी याला विरोध केला.
देवाने हृतिकला असेच बनवले आहे आणि त्याच्या शरीरासोबत छेडछाड करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. लहानपणापासून या अतिरिक्त अंगठ्यामुळे हृतिकला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही. तेव्हा ते कापून टाकणे चुकचे आहे, असे पिंकी यांचे ठाम मत होते. आईच्या या ठाम भूमिकेमुळे अखेर हृतिकने ऑपरेशन करण्याचा निर्णय रद्द केला.
अखेर या एक्ट्रा फिंगरसोबतच हृतिकला लॉन्च करण्यात आले. त्याचा पहिला सिनेमा होता ‘कहो ना प्यार है’. हा सिनेमा रिलीज झाला आणि चाहत्यांनी हृतिकला डोक्यावर घेतले. आपल्या अभिनयाच्या जोरावर हृतिकने प्रेक्षकांची मने जिंकली. आज हृतिकचे लाखो चाहते आहेत.