काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, जामीन फेटाळला जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:02 PM2019-07-04T16:02:54+5:302019-07-04T16:05:19+5:30
काळवीट शिकारप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातून सलमानची अद्याप तरी सुटका झालेली नाही. याउलट दिवसेंदिवस सलमानच्या अडचणीत वाढ होत आहे.
1998 च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दोषी ठरवले होते. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने हा निकाल 5 एप्रिल 2018 ला दिला होता. ही शिक्षा माफ व्हावी यासाठी सलमानच्या वकिलांकडून जोधपूर कोर्टात निवेदन करण्यात आले असून सध्या ही केस कोर्टात सुरू आहे. पण सलमानची या खटल्यातून अद्याप तरी सुटका झालेली नाही. याउलट दिवसेंदिवस सलमानच्या अडचणीत वाढ होत आहे.
सलमान कोर्टात हजर राहात नसल्याने न्यायाधीशांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. न्यायधीशांनी या तारखेला सलमानच्या वकिलांना सांगितले आहे की, सलमानने पुढील तारखेला कोर्टात हजर राहावे अन्यथा त्याचा जामीन फेटाळला जाईल. गेल्या तारखेला देखील सलमानने कोर्टात हजेरी लावली नव्हती, त्यावेळी सलमानला कोर्टात हजर राहाण्याविषयी सलमानच्या वकिलांना सांगण्यात आले होते. पण तरीही सलमान या तारखेला देखील उपस्थित राहिला नसल्याने न्यायधीशांनी त्याच्या वकिलांना सक्त ताकीद दिली.
हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असताना सलमान आणि या चित्रपटातील त्याच्या काही सहकलाकारांनी काळवीटाची शिकार केली असल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात सलमानला दोषी ठरवण्यात आले असले तरी त्याचे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.
काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला एप्रिल 2018 मध्ये शिक्षा सुनावल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. पण सलमानच्या जामिनाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. सलमानला आतापर्यंत जेव्हा जेव्हा जामिन मिळाला त्यावेळी त्याने कधीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन केलेले नाही त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. अखेर न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करत सलमानला जामीन मंजूर केला होता.