Blurr Movie Review : तापसी पन्नूचा 'ब्लर' चित्रपट पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:14 PM2022-12-09T18:14:37+5:302022-12-09T18:15:12+5:30
Blurr Movie Review : जाणून घ्या कसा आहे, तापसी पन्नूचा ब्लर चित्रपट
कलाकार : तापसी पन्नू, गुलशन देवैया, अभिलाष थपलियाल
दिग्दर्शक : अजय बहल
निर्माते : विशाल राणा, तापसी पन्नू, प्रांजल खांडडिया, टोनी डिसुजा, प्रदीप शर्मा, मानव दुर्गा
शैली : थ्रीलर ड्रामा
कालावधी : २ तास
स्टार - तीन स्टार
चित्रपट परीक्षण : अबोली शेलदरकर
‘बदला’, ‘दोबारा’ या सस्पेन्स थ्रिलरपटांनंतर आता अभिनेत्री तापसी पन्नू ‘ब्लर’ चित्रपट घेऊन आलीय. तापसी भूमिकांच्या बाबतीत प्रचंड चोखंदळ आहे. तिच्या भूमिका ती अत्यंत ताकदीने पेलते. स्त्रीप्रधान चित्रपटात भूमिका करण्याकडे तिचा कल असतो. नेहमीप्रमाणे अत्यंत हुशारीने भूमिका करणारी तापसी आणि तिच्यासोबत गुलशन देवैया आणि अभिलाष थपलियाल या कलाकारांची भट्टी यात जमली आहे. चला तर मग बघू यात काय आहे या चित्रपटाचे कथानक.
कथानक :
गायत्री आणि गौतमी या दोन जुळ्या बहिणींची ही कहाणी आहे. गौतमी (तापसी पन्नू) हिला कमी दिसायला लागते आणि ती एकटी राहत असते. एके दिवशी गौतमी आत्महत्या करते, पण गायत्री (तापसी पन्नू) ला विश्वास असतो की, ही आत्महत्या नसून हा खून आहे. गायत्री तिचा पती निल (गुलशन देवैया) ला सोबत घेते आणि पोलिसांना बोलावून काही पुरावा मिळतो का ते बघते. या दरम्यान, गायत्रीलाही कमी दिसू लागते. घरातील तणावामुळे तिला कमी दिसते, असे यात दाखविण्यात येते. गायत्री तिचे प्रयत्न सुरूच ठेवते आणि मग निलचे सत्य समोर येते. त्यानंतर, अजून काही रहस्य उलगडतात. गौतमीचा खून का होतो? तिचा खून करणाऱ्याचा पर्दाफाश गायत्री करू शकते का? या सर्वांची उत्तरे हवी असतील, तर तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.
लेखन व दिग्दर्शन :
चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अजय बहल यांनी आपल्या समर्थ खांद्यावर पेलल्या आहेत. पवन सोनी यांनी बहल यांनी लेखनात साहाय्य केले आहे. चित्रपटाचा सस्पेन्स निर्माण करण्यात लेखकांना यश आले आहे. मात्र, काही काळानंतर तो ओढल्यासारखा वाटतो. कॅमेरा वर्क आणि त्याचे एडिटिंग अत्यंत उत्तम करण्यात आले आहे. बॅकग्राऊंड म्युझिक वेगवेगळ्या सीन्सनुसार प्रेक्षकांवर चांगला परिणाम पाडते. बहल यांच्या दिग्दर्शनाने प्रेक्षकांवर छाप टाकली आहे.
अभिनय :
तापसीने अजून एकदा हे सिद्ध केले की, ती आपल्या खांद्यावर एखादा चित्रपट समर्थपणे पेलू शकते. काही सीन्समध्ये ती तिच्या अभिनयाचे चौकार मारते तर कधी थोडीशी ऑफ झाल्याची दिसते. यात गुलशन देवैया यांनी देखील तापसीला उत्तम साथ दिली आहे. चित्रपटागणिक गुलशन यांच्या अभिनयात सुधारणा होत असल्याचे दिसून येतेय.
सकारात्मक बाजू : तापसीचा अभिनय, सस्पेन्सपट.
नकारात्मक बाजू : काही विशेष नाही
थोडक्यात : तुम्हाला तापसीचा अभिनय आणि सस्पेन्सपट आवडत असतील तर तुम्ही जरूर चित्रपट बघावाच.