सलमान खानच्या सुरक्षेवर पहिल्यांदाच बॉडीगार्ड शेराची प्रतिक्रिया, म्हणाला, "जे घडू नये ते देशात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 11:14 AM2024-12-04T11:14:50+5:302024-12-04T11:20:07+5:30
शेरा गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानच्या मागे सावलीसारखा असतो.
'दबंग' अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) सुरक्षेची सध्या विशेष काळजी घेतली जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमक्यांनंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात आली. सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. शिवाय सलमानचे वडील सलीम खान यांनाही मॉर्निंग वॉक करताना धमकी आली होती. अशातच सलमानच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सलमानचा विश्वासू बॉडीगार्ड शेरा त्याच्या सुरक्षेवर पहिल्यांदाच बोलला आहे.
शेरा गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानच्या मागे सावलीसारखा असतो. मात्र सध्या सलमानला येणाऱ्या धमक्यांमुळे शाही अलर्टवर आहे. नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत शेरा म्हणाला, "सगळं ठीक आहे. ७ तारखेला आमचा दुबईत शो आहे. बाकी सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सगळी काळजी घेतली आहे. जसं की तुम्ही पाहत आहात जे घडू नये अशा गोष्टी देशात होत आहेत. मुंबई पोलिस पूर्ण पाठिंबा देत आहे. मुंबई पोलिसांचं काम सगळ्यांना माहितच आहे. एकदम १०० टक्के."
सलमान खान लवकरच दुबई येथे त्याच्या 'दबंग टूर'साठी जात आहे. त्याच्यासोबत इतरही काही कलाकार असणार आहेत. तसंच सध्या तो 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. हैदराबादमध्ये शूट केल्यानंतर सिनेमाची टीम मुंबईत शूट करत आहे. यानंतर सलमान दुबईला रवाना होणार आहे.