"मी पूर्णपणे थकलोय...", अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयावर विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:57 IST2024-12-14T12:50:33+5:302024-12-14T12:57:55+5:30
अभिनेता विक्रांत मेस्सीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

"मी पूर्णपणे थकलोय...", अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयावर विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया
Vikrant Messay : 'धरम वीर', 'बालिका वधू', 'कुबूल है' आणि 'बाबा ऐसा वर ढुंढो' सारख्या मालिकांमध्ये काम करून अभिनेता विक्रांत मेस्सीने छोटा पडदा गाजवला. परंतु '१२ वी फेल' या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटामुळे त्याला स्टारडम मिळाला. विक्रांत मेस्सीची (Vikrant Messay) अभिनय कारकीर्द बरीच मोठी आहे. अलिकडेच विक्रांत मेस्सीने सोशल मीडिया अभिनयातून ब्रेक घेत असल्याची पोस्ट केली होती. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्याने अचानक एवढा मोठा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.
नुकतीच विक्रांत मेस्सीने 'टाईम्स नाऊ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने अनेक खुलासे केले. त्यादरम्यान विक्रांत म्हणाला, "माझ्या आयुष्यात असं काही घडेल, याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. '१२ वी फेल' चित्रपट मी केला आणि चाहत्यांनी माझ्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. माझं एक स्वप्न होतं की एक ना एक दिवस मला फिल्मफेयर पुरस्कार मिळेल आणि मला तो मिळाला. यानंतर विक्रांत म्हणाला, "एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या व्यक्तीची देशाच्या पतंप्रधानांसोबत भेट होणं, शिवाय पंतप्रधानांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांसोबत एकत्र बसून आपला सिनेमा पाहणं ही फार मोठी गोष्ट आहे."
अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयावर विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया
पुढे विक्रांतने त्याच्या करिअरचा त्याच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केलं. त्यावेळी विक्रांत म्हणाला, "शारिरीकदृष्ट्या मी पूर्णपणे थकलो आहे. या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करताना सगळ्याच गोष्टीचं संतुलन राखणं मला अवघड जातं आहे." त्यानंतर अभिनेत्याने फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं. "मी त्या पोस्टमध्ये जरा जास्तच इंग्रजी लिहिली होती. त्यामुळे प्रत्येकाला मी नक्की काय लिहिलंय हे समजलं नाही."
वर्कफ्रंट
विक्रांत मेस्सीने त्याच्या अभिनय कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. '12वीं फेल','द साबरमती रिपोर्ट', 'कार्गो' गंज यांसारख्या चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला.