अभिषेक बच्चनने शेअर केला व्हिडिओ, म्हणतो 'I Want To Talk'; अभिनेत्याला नक्की काय सांगायचंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:08 PM2024-10-23T13:08:18+5:302024-10-23T13:09:09+5:30
अभिषेक बच्चन म्हणतोय 'I Want To Talk', व्हिडिओतून नक्की काय सांगायचंय?
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहे. नुकतंच अभिषेक बच्चनच्या नव्या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. I Want To Talk असं अभिषेकच्या नव्या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या टीझरबरोबरच रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. काही सेकंदाच्या टीझरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
I Want To Talk सिनेमाच्या टीझरमध्ये एका कारमध्ये अभिषेकच्या चेहऱ्याचं एक कार्टून दिसत आहे. "मला फक्त बोलायला आवडत नाही...तर मी बोलण्यासाठी जगतो. जीवन आणि मृत्यूमध्ये मला ही एकच गोष्ट वेगळी वाटते. जिवंत लोक बोलू शकतात...पण, मृत व्यक्तींना बोलता येत नाही", असं अभिषेक या टीझरमध्ये म्हणत आहे. या ३४ सेकंदाच्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
"आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जी बोलण्यासाठी जगते. ही एका अशा माणसाची गोष्ट आहे जो कायमच आयुष्याच्या चांगल्या बाजूकडे पाहतो, मग किती संकंट येऊ दे...", असं म्हणत अभिषेकने हा टीझर शेअर केला आहे. येत्या २२ नोव्हेंबरला अभिषेकचा I Want To Talk हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.