"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 02:06 PM2024-12-11T14:06:13+5:302024-12-11T14:10:18+5:30
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
Bobby Deol: संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचं कथानक, कलाकारांची अभिनय आणि गाण्यांना प्रेक्षकांची दाद मिळाली. अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor), बॉबी देओल (Bobby Deol) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांसारख्या कलाकारांची फळी सिनेमात पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिसवर 'अॅनिमल'ने जवळपास ९०० कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटातील 'जमाल कुडू' हे गाणं देखील प्रचंड गाजलं होतं. अभिनेता बॉबी देओल 'जमाल कुडू' गाण्यामध्ये डोक्यावर ग्लास घेऊन डान्स करताना दिसला. या गाण्यामधील त्याची हुकस्टेपने वेड लावलं. परंतु ही डान्स स्टेप बॉबी देओलला कशी सूचली याचा खुलासा अभिनेत्याने एका मुलाखतीत केला आहे.
नुकतीच सनी देओल आणि बॉबी देओल यांनी इंडियन एक्सप्रेसच्या 'स्क्रीन लाईव्ह'मध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान अभिनेत्याने 'अॅनिमल'मधील 'जमाल कुडू' गाण्याचा एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. त्यावेळी बॉबी देओल म्हणाला की, "मला आजही आठवतं संदीपने मला तो सीन समजावून सांगितला. तेव्हा त्याने सांगितलं की, तुझं लग्न आहे आणि तुला डान्स करायचा आहे. मग मी त्यांना स्पष्टपणे म्हटलं, मी कोरिओग्राफरबरोबर डान्स करू शकत नाही आणि त्यानंतर मग मी डान्स करायला सुरुवात केली. त्यादरम्यान संदीप मला थांबवलं आणि तो म्हणाला, यासाठी मला हे पात्र बॉबी देओलसारखं नाही तर अबरारच्या व्यक्तिरेखेप्रमाणे दिसायला पाहिजे. यावर मी विचार करायला सुरूवात केली की मी आता काय करू शकतो? मग मी लगेचच सौरभ सचदेवाकडे गेलो, त्याने या चित्रपटात माझ्या भावाची भूमिका साकारली होती. मग मी त्याला विचारलं की, तू कसा डान्स करतोस? त्यानंतर त्याने डान्स करायला सुरुवात केली आणि अचानक काय झालं कळलंच नाही. माझ्या मनात बऱ्याच गोष्टी येऊ लागल्या."
पुढे अभिनेता म्हणाला, "मी लहान असताना हिवाळ्यात व उन्हाळ्यात सुटीसाठी पंजाबला जायचो. त्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी तिथे पुरुष मद्यपान करत असत आणि मग गाणं लावून आपल्या डोक्यावर ग्लास व बाटली ठेवून ते लोक नाचायचे. ही कल्पना मला त्यांच्यामुळे सूचली. मग मी माझ्या डोक्यावर ग्लास ठेवला आणि डान्स करायला सुरुवात केली." असं म्हणत बॉबी देओलने मजेशीर किस्सा शेअर केला.